डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता घटतेय
By Admin | Published: June 17, 2016 06:09 AM2016-06-17T06:09:23+5:302016-06-17T06:09:23+5:30
‘ही इज नॉट टफ, नॉट स्मार्ट अॅण्ड देअर इज समथिंग गोइंग आॅन इन हिज माइंड’ आॅरलॅण्डो येथील नाइट क्लबमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेनंतर गेले तीन दिवस अमेरिकेत
- अपर्णा वेलणकर (थेट अमेरिकेतून)
सॅन फ्रान्सिस्को : ‘ही इज नॉट टफ, नॉट स्मार्ट अॅण्ड देअर इज समथिंग गोइंग आॅन इन हिज माइंड’ आॅरलॅण्डो येथील नाइट क्लबमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेनंतर गेले तीन दिवस अमेरिकेत धुमश्चक्री उडवून दिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसिडेण्ट ओबामा यांच्यावर सरळ सरळ केलेला हा संशयाचा वार आश्चर्यकारकरीत्या ट्रम्प यांच्यावरच उलटण्याची चिन्हे असून बुधवारी सकाळी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचण्यांमधून ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत.
अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रायमरीजची फेरी सुरू झाल्यापासून डेमोक्रॅटिक पक्षाच्या इच्छुक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर प्रथमच दोन आकडी (बारा टक्के) मताधिक्याची आघाडी घेतली आहे. ओरलॅण्डोमधील घटनेनंतर ‘रॅडिकल इस्लाम’ असे शब्द उच्चारायला नकार दिल्याबद्दल ओबामा, ‘न्यायप्रिय’ अमेरिकन नागरिकांच्या हातातली शस्त्रे काढून त्यांना संकटात ढकलण्याचा प्रस्ताव मांडल्याबद्दल हिलरी क्लिंटन आणि ‘दहशतवादी पार्श्वभूमी’ असलेल्या सगळ्याच देशांमधून अमेरिकेला येऊ इच्छिणारे ‘इमिग्रण्ट’ या सगळ्यांच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी जणू आघाडीच उघडली आहे. ओबामा यांना क्लॉझेट मुस्लीम (छुपे मुस्लीम समर्थक) ठरवण्यापासून सर्व मुस्लिमांना अमेरिकेची दारे बंद करण्याच्या घोषणांपर्यंतच्या त्यांच्या भडक, वाचाळ आणि अविचारी वक्तव्यांचे संदर्भच ओरलॅण्डोच्या घटनेने बदलले आहेत. देशाचा असा कडेकोट किल्ला करण्याच्या वल्गनांमधला पोकळपणा ताज्या हत्याकांडाने उघड केला असून त्यामुळेच ट्रम्प यांची आधीची जनप्रियता घसरणीला लागल्याचे निष्कर्ष मांडले जात आहेत.
अध्यक्षीय निवडणुकीच्या नामांकन फेरीची धामधूम ऐन कळसाला पोहोचलेली असताना एका मुस्लीम माथेफिरू तरुणाने नाइट क्लबमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबाराची घटना ट्रम्प यांच्या पथ्यावर पडणार आणि ते ‘... सी? आय टोल्ड यू’च्या स्वरात आधीच गोंधळलेल्या अमेरिकन मतदारांच्या मनातल्या भीतीवर फुंकर घालून त्यांना आपल्याकडे खेचणार, असे आडाखे बांधले जाणे स्वाभाविक होते. तसे झालेही!
भारतात ऐन निवडणूक प्रचाराच्या काळात नेमका मुहूर्त साधून ‘घडणाऱ्या’ दंगलींशी परिचित असलेल्या देसी जनतेने तर ‘या ओमार मातीनला ट्रम्पनेच गन दिली नसेल कशावरून?’ असे मेसेजेसही फिरते ठेवले. ...पण मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधून, मुस्लिमांवर सरसकट प्रवेशबंदी लादून अमेरिकेतला दहशतवाद उखडण्याचे दावे करून जनमताला आपल्या बाजूने खेचणाऱ्या ट्रम्प महाशयांच्या घोडदौडीला ओमारच्या माथेफिरू गोळीबाराने मात्र लगाम लावल्याचे चित्र अमेरिकेत आहे.
हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातल्या अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होत असताना आधीच तापलेले अमेरिकेतले राजकीय वातावरण ओरलॅण्डोमधल्या घटनेनंतर आणखी चिघळणार आणि हा बदल आपल्या अतिरेकी वक्तव्यांनी जगाला अचंब्यात पाडणाऱ्या ट्रम्प यांच्या पथ्यावर पडणार अशा काळजीने ग्रासलेल्या राजकीय विश्लेषकांना अमेरिकेतील सामान्य नागरिकांच्या ‘विवेकबुद्धी’ने काहीसा धक्का बसल्याचे त्यांच्या स्वरातून जाणवते आहे.
मुस्लिमांवर सरसकट प्रवेशबंदी लादण्याचे जोरदार समर्थन करून ‘ओरलॅण्डोच्या त्या नाइट क्लबमधल्या बाकीच्या लोकांकडे बंदुका असत्या तर ते ओमारला अडवू शकले असते आणि मग इतक्या मोठ्या संख्येने लोक मारले गेले नसते’’ असे नवे तर्कट मांडणाऱ्या ट्रम्प यांना स्वपक्षीयांच्याही टीकेची धार आता सोसावी लागते आहे. ट्रम्प यांच्या अविचारी भडकपणाने रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर माध्यमांपासून तोंड चुकवण्याची वेळ आली असून ट्रम्प म्हणतात तो मार्ग योग्य नव्हे, असे स्पष्टपणे सांगणाऱ्या नेत्यांची संख्या गेल्या दोन दिवसांत वाढली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षातली फूटही आता अधिक उघड होते आहे. आज (बुधवारी) अमेरिकन सिनेटमध्ये अमेरिकेतल्या शस्त्रांच्या सहज उपलब्धतेवर बंदी/मर्यादा घालण्याबाबत (गन कंट्रोल) महत्त्वपूर्ण चर्चा नियोजित असून ओरलॅण्डो हत्याकांडाच्या ताज्या पार्श्वभूमीवर ‘नो फ्लाय नो बाय’ या प्रलंबित विधेयकाला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न डेमोक्रॅट्स करतील.
स्ट्राँगर टुगेदर
डेमोक्रॅट पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी आता निश्चित झाली असून त्यांच्यासाठी कडवे आव्हान उभे करणारे बर्नी सॅण्डर्स यांनी अजून औपचारिकपणे आपला ‘क्लेम’ सोडला नसला, तरी हिलरी यांच्याबरोबर काम करण्याचे जाहीर करून एक पाऊल मागे घेतले आहे. ट्रम्प यांच्याविषयी सर्वसामान्य अमेरिकनांमध्ये असलेल्या आकर्षणाला (किंचितशी का असेना) ओहोटी लागल्याचे निष्कर्ष जाहीर होत असतानाच हिलरी क्लिंटन यांच्या कॅम्पने अचूक वेळ साधत आपला पवित्रा अधिक नेमका, टोकदार केल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांच्या वादळाला थोपवताना घसरलेली भाषा सावरून शब्दांचा संयत जबाबदार वापर करणाऱ्या हिलरी यांनी बुधवारी हॅम्पटन येथे झालेल्या सभेत ट्रम्प यांचा (सरसकट) मुस्लीमविरोध खोडून काढला.
‘ओमार मातीनचा जन्म अफगाणिस्तानात झालेला नाही. खुद्द ट्रम्प जिथे जन्मले तिथून काही तासांवर असलेल्या क्विन्स (न्यूयॉर्क) मध्ये ओमार जन्मला होता, हे त्यांनी विसरू नये’ असा टोला त्यांनी ट्रम्प यांना लगावला. ‘कोणती भिंत बांधून इंटरनेट (त्यावरून होणारा कट्टरतावादाचा प्रचार) कसे थोपवता येते, ते मला माहीत नाही,’ असेही त्या म्हणाल्या.
वॉशिंग्टनच्या एका हॉटेलमध्ये हिलरी आणि बर्नी सॅण्डर्स यांच्यात तब्बल ११० मिनिटे झालेली बैठक येथे औत्सुक्याचा विषय असून या दोघा डेमोक्रॅट प्रतिस्पर्ध्यांमधले एकमत निश्चित मानले जाते आहे. ओरलॅण्डो येथील घटनेमुळे स्थगित झालेली प्रेसिडेण्ट ओबामा यांची सभा या आठवड्यात ग्रीन बे (विस्कॉन्सिन) येथे होईल. त्या सभेदरम्यान ते हिलरी यांची उमेदवारी ‘एन्डॉर्स’ करतील.