'डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपला, राजीनामा दिला'; परराष्ट्र मंत्रालयामुळे उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 10:59 AM2021-01-13T10:59:03+5:302021-01-13T11:05:22+5:30
Donald Trump Resign news: अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर आलेल्या एका अपडेटने जगभरात खळबळ उडाली. वेबसाईटवर डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा कार्यकाळ संपल्याचे दाखविण्यात आले.
अमेरिकेत नवीन सरकार बनविण्याची तयारी जोरात सुरु झाली आहे. दुसरीकडे आज मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता होती. अशातच ट्रम्प यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने अमेरिकेसह जगभरात काही काळ खळबळ उडाली होती.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर आलेल्या एका अपडेटने जगभरात खळबळ उडाली. वेबसाईटवर डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा कार्यकाळ संपल्याचे दाखविण्यात आले. तसेच राजीनामा दिल्याचे म्हटले गेले. महत्वाचे म्हणजे जेव्हा ट्रम्प त्यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव एक बकवास असल्याचे सांगत असताना दुसरीकडे ही हालचाल केली गेली. नंतर हा वेबसाईटचे काम पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचा खोडसाळपणा असल्याचे उघड झाले.
वेबसाईटवर राष्ट्राध्यक्ष आणि उप राष्ट्राध्यक्षांच्या प्रोफाईलवर ही माहिती अपडेट करण्यात आली. 11 जानेवारीला त्यांचा कार्यकाळ संपला असून नवीन सरकार आल्यावर त्याबाबतची माहिती अपडेट केली जाईल, असे म्हटले होते. जगभरात यावरून चर्चा झडू लागल्यानंतर अमेरिकी मिडीयाने याचा खुलासा केला. हे कृत्य परराष्ट्र मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याने केले असून तो सध्याच्या सरकारवर नाराज होता. ट्रम्प आणि पेन्स यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. दोघांचाही कार्यकाळ 20 जानेवारीला संपणार आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही.
सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया यायला लागल्या. हा एक सत्ता हस्तांतराचा हिस्सा असू शकतो. या कर्मचाऱ्याने चुकून तो वेबसाईटवर पोस्ट केला. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन 20 जानेवारीला शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांनी यावर नाराजी व्यक्त केली असली तरीही हस्तांतरण योग्य पद्धतीने पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, माईक पेन्स यांनी संविधानाच्या 25 व्या संशोधनाचा वापर करण्यास नकार दिल्याने ट्रम्प याच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया रद्द झाली असून ट्रम्प त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार आहेत.