गाढवामुळे मालकाला ५,११५ पौंडांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:25 AM2017-10-02T02:25:22+5:302017-10-02T02:25:27+5:30
भुकेल्या गाढवाच्या मालकासमोर नवेच संकट उभे ठाकले आहे. व्हीटस नावाच्या गाढवाने गेल्या सप्टेंबरमध्ये नारंगी रंगाची कार खायचा प्रयत्न केला होता. या कारची किमत दोन लाख पौंड एवढी आहे.
भुकेल्या गाढवाच्या मालकासमोर नवेच संकट उभे ठाकले आहे. व्हीटस नावाच्या गाढवाने गेल्या सप्टेंबरमध्ये नारंगी रंगाची कार खायचा प्रयत्न केला होता. या कारची किमत दोन लाख पौंड एवढी आहे. या कारच्या मालकाला गाढवाच्या मालकाने भरपाई द्यावी असे आदेश जर्मनीच्या एका न्यायालयाने दिले आहेत.
व्हीटस नावाचा हा गाढव जेथे होता त्या जवळच ही कार उभी केली गेली होती. ही कार म्हणजे फार मोठे गाजर असल्याचे समजून व्हीटसने कारच्या मागच्या बाजुला चावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारच्या रंग व कार्बन-फायबरचे नुकसान झाले. हे नुकसान तब्बल ५,८०० युरोचे (५,११५ पौंड) होते. भरपाई गाढवाच्या मालकाने आपल्याला द्यावी, अशी मागणी कारमालकाने केली होती. मात्र त्याला गाढवाच्या मालकाने नकार दिल्याने कारमालकाने कोर्टाची पायरी चढली. कोर्टातही गाढवाच्या मालकाने कारमालकाला तुम्ही कार उभी करण्यासाठी अधिक चांगली जागा शोधायला हवी होती, असे सांगून भरपाई द्यायला नकार दिला. मात्र, कोर्टाने कारमालकाच्या बाजुने निकाल देत गाढवाच्या मालकाने कारमालकाला ५,११५ पौंड भरपाई देण्याचे आदेश दिले.