तुमच्या वादात आम्हाला ओढू नका! इराणचा मदत मागण्यासाठी गेलेल्या हमासला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 07:30 PM2023-11-15T19:30:18+5:302023-11-15T19:30:34+5:30
पूर्ण ताकद लावून इस्रायलने हमासची कंबर मोडण्यास सुरुवात केली आहे. असे असताना हमासचे नेते मदतीसाठी समर्थक देशांकडे जाऊ लागले आहेत.
इस्त्रायल आणि हमासच्या युद्धाला बुधवारी ४० दिवस झाले आहेत. इस्त्रायलने हमासच्या संसदेवर हल्ला करत ती ताब्यात घेतली आहे. आता हळूहळू गाझापट्टी ताब्यात येण्याची शक्यता आहे. पूर्ण ताकद लावून इस्रायलने हमासची कंबर मोडण्यास सुरुवात केली आहे. असे असताना हमासचे नेते मदतीसाठी समर्थक देशांकडे जाऊ लागले आहेत. यापैकीच एक सर्वात मोठा समर्थक असलेल्या इराणने हमासला झिडकारले आहे.
आम्ही तुमच्यावतीने इस्त्रायलविरोधातल्या युद्धात सहभागी होणार नाहीय. उगाच आम्हाला तुमच्या वादात ओढू नका, अशा शब्दांत इराणच्या सर्वोच्च नेत्याने हमासला हाकलून लावले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी हमासला म्हटले की, तुम्ही आम्हाला 7 ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या हल्ल्याबाबत कोणताही इशारा दिला नव्हता. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्या वतीने या युद्धात सहभागी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
इराण हमासला राजकीय आणि नैतिक पाठिंबा देत राहील परंतु युद्धात थेट हस्तक्षेप करणार नाही, असा स्पष्ट संदेश खामेनेई यांनी इस्मायल हानियाहला दिला आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाहने सध्या युद्धातून माघार घेण्याचे जाहीर केले होते, तेव्हा खामेनेई आणि हमास प्रमुख हानिया यांच्यात 5 नोव्हेंबरला भेट झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. पण हमास प्रमुखाने इराणकडून युद्धासाठी शस्त्रास्त्रांसाठी मदत मागितली होती, असे सांगण्यात येत आहे.
7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा पट्टीतून 5 हजारांहून अधिक रॉकेट डागून इस्रायलवर हल्ला केला. यानंतर लगेचच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. या हल्ल्यात गाझापट्टी पूर्णपणे उध्व्स्त झाली आहे.