लग्न नको; पण तेरेसाला आई व्हायचंय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 09:57 AM2023-05-13T09:57:01+5:302023-05-13T09:59:25+5:30

चीनमधल्या बिजिंग शहरात राहणारी तेरेसा शू. सध्या ती ३५ वर्षांची आहे.

Don't get married But Teresa wants to be a mother | लग्न नको; पण तेरेसाला आई व्हायचंय!

लग्न नको; पण तेरेसाला आई व्हायचंय!

googlenewsNext

चीनमधल्या बिजिंग शहरात राहणारी तेरेसा शू. सध्या ती ३५ वर्षांची आहे. वयाच्या विशी-तिशीत प्रत्येक तरुण-तरुणीला भविष्याची जशी स्वप्नं पडतात, करिअरसाठी ते जसे झपाटलेले असतात, आयुष्यात काही तरी करून दाखवण्याच्या ऊर्मीनं ते झपाटलेले असतात..तशीच तेरेसाही होती. ती लेखिकाही आहे. ज्या वयात करिअर करायचं, ज्या वयात स्वप्नांच्या पाठीमागे धावायचं आणि ती पूर्ण व्हावीत यासाठी स्वत:ला झोकून द्यायचं, त्या वयात लग्न वगैरे करणं या गोष्टी तिला मान्य नव्हत्याच. मुळात तिला लग्नच करायचं नव्हतं. लग्नानंतर आपलं स्वातंत्र्य गमावण्याची  शक्यता तिला अस्तित्वातच येऊ द्यायची नव्हती. मात्र, तिला लग्न करायचं नव्हतं, म्हणजे तिला आई व्हायचंच नव्हतं, असं नाही; पण आई होण्याची आपली इच्छा काही काळासाठी तरी तिनं दूर सारली होती, कारण आपल्या स्वप्नांची पूर्ती हे तिचं पहिलं उद्दिष्ट होतं.

अर्थात जसजसं वय वाढत जातं, तसतसं प्रजननक्षमता कमी होत जाते, हेही तिला माहीत होतं, त्यामुळे त्यासाठी तिला फार उशीरही करायचा नव्हता. आपली अंडबीजं तिला फ्रीज करून ठेवायची होती; पण त्यासाठी अजून वेळ आहे, म्हणून तिनं पहिल्यांदा प्राधान्य दिलं ते आपल्या करिअरकडे. पण पाच वर्षांनी आपली अंडबीजंही आपल्याला गोठवून ठेवता येणार नाहीत, फ्रीज करता येणार नाहीत, हे तेव्हा तिला कुठे माहीत होतं?..

फोटोग्राफरने फसवलं, मॉडेलचे BOLD फोटो 'अडल्ट' बेवसाईटवर Upload तरीही गुन्हा नाहीच; कारण...

आपल्या करिअरचे काही टप्पे पार केल्यानंतर तेरेसानं ठरवलं, आता आपली अंडबीजं एखाद्या नामांकित रुग्णालयात गोठवून ठेवायला काही हरकत नाही. त्यामुळे ती बिजिंगमधल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये गेली. आपली अंडबीजं गोठवून ठेवायची विनंती तिनं रुग्णालयाला केली; पण रुग्णालयानं तिला सपशेल नकार दिला. अविवाहित तरुणींची अंडबीजं गोठवून ठेवायची मान्यता आम्हाला नाही, कारण कायद्यानंच आम्हाला तशी परवानगी नाही, असं रुग्णालय प्रशासनानं तिला सांगितलं.

तेरेसाचा प्रचंड संताप झाला. हा आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याविरुद्धचा घाला आहे, असं तिला वाटलं. तिनं अनेक परचितांचा, कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला. प्रत्येकानं तिला हेच सांगितलं की, याविरुद्ध कोर्टात दावा दाखल करून काहीही फायदा होणार नाही. कशासाठी त्रास करून घेतेस? कारण कायदा तुझ्या बाजूनं नाही. सरकारच म्हणतंय, की अविवाहित तरुणींना आपली अंडबीजं गोठवून ठेवता येणार नाहीत, तर कोर्टात केस करूनही तू जिंकण्याची शक्यता जवळपास शून्य आहे; पण तरीही तेरेसानं ऐकलं नाही. न्याय मिळाला नाही तरी चालेल, आपल्या हक्कांसाठी आपण लढलंच पाहिजे, कदाचित न्याय मिळेलही आणि पुढच्या महिलांना त्याचा उपयोग होऊ शकेल, या हेतूनं २०१९मध्ये तिनं बिजिंगच्या प्रसूती आणि स्त्रीरोग रुग्णालयाविरुद्ध दावा दाखल केला.

ज्या कारणानं तेरेसानं हॉस्पिटलविरुद्ध दावा दाखल केलाय, हे कळल्यावर संपूर्ण चीनमध्ये एकच खळबळ उडाली. कारण, अशा प्रकारचा हा पहिलाच दावा होता. मला लग्न करायचं नाही, एखाद्या पुरुषासोबत संगही करायचा नाही, पण मूल जन्माला घालायची शक्यताही मला सोडून द्यायची नाही, असा विचार करून म्हटलं तर प्रत्यक्ष सरकारविरुद्धच पंगा घेणारी तेरेसा त्यामुळे चीनमध्ये लगेच प्रसिद्ध झाली.

सध्याच्या नियमांनुसार चीनमध्ये कोणत्याही अविवाहित महिलेला आपली अंडबीजं गोठवून ठेवण्याचा, संरक्षित करून ठेवण्याचा अधिकार नाही. प्रजनन समस्या असलेल्या विवाहित महिलांसाठीच केवळ ही सहायक पुनरुत्पादक तंत्रज्ञान सेवा उपलब्ध आहे; पण नजीकच्या गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. चीनमध्ये वृद्धांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे आणि त्याचवेळी जननदर मात्र  कमी होतो आहे.

गेल्या कित्येक दशकांतला सर्वांत कमी जननदर चीन अनुभवतो आहे. लग्नांचाही आतापर्यंतचा नीचांकी आकडा चीननं नोंदवला आहे. काहीही करून आपल्या देशांतील तरुण लोकसंख्या वाढावी, नवी बाळं जन्माला यावीत यासाठी चीन आता प्रयत्न करतो आहे.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारला सल्ला देणाऱ्या तज्ज्ञांनी अविवाहित, एकल महिलांनाही आपली अंडबीजं गोठवून ठेवण्याचा, आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर त्यांना करू दिला जावा, यासाठीची शिफारस सरकारला नुकतीच केली आहे. चीनच्या काही प्रांतांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची परवानगीही दिली गेली आहे.

महिलांना प्रजनन स्वायत्तता हवी!

परिस्थिती बदलल्यामुळे आता आपल्याला आपली अंडबीजं गोठवता येऊ शकतील, ही शक्यता वाढल्यानं तेरेसाही उत्साहित आहे. मूल जन्माला घालण्यासाठी नवरा किंवा एखाद्या पुरुषावर अवलंबून राहण्यापेक्षा तंत्रज्ञानाचे अधिकाधिक पर्याय महिलांना उपलब्ध झाले पाहिजेत, असं तेरेसाला वाटतं. तेरेसा म्हणते, महिलांना शारीरिक आणि प्रजननासंदर्भातील स्वायत्तता असलीच पाहिजे.

Web Title: Don't get married But Teresa wants to be a mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.