देश आवडला नाही? मग पैसे घ्या अन् चालते व्हा! स्वीडनचा निर्णय, प्रवासाचे भाडेही देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 05:52 AM2024-08-18T05:52:53+5:302024-08-18T05:53:14+5:30
Sweden : स्वीडनमध्ये परदेशातून स्थायिक झालेल्या नागरिकांना देश साेडल्यास पैसे दिले जातात. मात्र, नव्या नियमानुसार जन्मजात नागरिकांचाही यात समावेश करण्यात येणार आहे.
स्टाॅकहाेम : देशाची संस्कृती आवडली नाही किंवा वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही, असे लाेक देश साेडून जाऊ शकतात, असा निर्णय स्वीडनने जाहीर केला आहे. या लाेकांना देशाबाहेर जाण्यासाठी पैसे आणि प्रवासभाडेदेखील देण्यात येईल. स्वीडनच्या इमीग्रेशन मंत्री मारिया स्टेनगार्ड यांनी हा प्रस्ताव दिला आहे.
स्वीडनमध्ये परदेशातून स्थायिक झालेल्या नागरिकांना देश साेडल्यास पैसे दिले जातात. मात्र, नव्या नियमानुसार जन्मजात नागरिकांचाही यात समावेश करण्यात येणार आहे. स्वीडनमध्ये देश साेडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच देशात येणाऱ्या लाेकांची संख्या घटली आहे. यापूर्वी देश साेडणाऱ्यांना १४,८०० अमेरिकन डाॅलर एवढी रक्कम देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला हाेता. मात्र, ताे फेटाळण्यात आला.
किती पैसे मिळतात?
१० हजार स्वीडिश क्राेन म्हणजे सुमारे ८० हजार रुपये देश साेडणाऱ्या स्वीडिश नागरिकाला मिळतात. ४० हजार रुपये मुलांना देण्यात येतात.याशिवाय प्रवासभाडेदेखील देण्यात येते. ही रक्कम एकदाच देश साेडण्यापूर्वी देण्यात येते.