चीनकडून ५जी तंत्रज्ञान घेऊ नका; अमेरिकेचा अप्रत्यक्ष इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 03:49 AM2019-08-01T03:49:23+5:302019-08-01T03:49:40+5:30
कारवाई : हुआवी कंपनीवर अमेरिकेची याआधीच बंदी
वॉशिंग्टन : सर्वसत्तावादी देशांकडून ५जी तंत्रज्ञान घेण्यापूर्वी दीर्घकालीन परिणामांचा विचार करा, असा इशारा अमेरिकेने जगातील देशांना दिला आहे. यात अमेरिकेने चीनचे प्रत्यक्ष नाव घेतले नसले तरी चीन आणि या कम्युनिस्ट देशाची बलाढ्य कंपनी हुआवीला उद्देशूनच हा इशारा दिल्याचे स्पष्ट आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने मे महिन्यात एक आदेश काढून हुआवी आणि तिच्याशी संबंधित अन्य ६८ कंपन्यांना सुटे भाग व तंत्रज्ञान विकण्यास अमेरिकी कंपन्यांवर बंदी घातली होती. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात येत असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले होते. हुआवीच्या ५जी तंत्रज्ञानावर मर्यादा अथवा बंदी घालण्याची विनंती अमेरिकेकडून भारतासह अनेक देशांना करण्यात येत आहे. ५जी तंत्रज्ञानाचा वापर चीनकडून हेरगिरीसाठी केला जाऊ शकतो, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. हुआवीने मात्र आपल्या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका नसल्याचे म्हटले आहे.
५जी हे पुढील पिढीतील मोबाईल इंटरनेट सेवा देणारे तंत्रज्ञान आहे. स्मार्टफोनवर डाऊनलोडिंगची प्रचंड गती आणि विश्वसनीय जोडणी हे ५जीचे वैशिष्ट्य आहे.
ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लोकांच्या दैनंदिन जीवनात, तसेच अर्थव्यवस्था व संस्कृती यात राज्यव्यवस्था सर्वसत्तावादी असल्याची भूमिका बाळगणाºया कोणत्याही देशाकडून ५जी तंत्रज्ञान कोणत्याही देशाने घेऊ नये. या देशाकडून तंत्रज्ञान घेतल्यास काय दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, याचा विचार सर्व देशांनी करायला हवा. (वृत्तसंस्था)
नव्या तंत्रज्ञानामुळे हेरगिरीचा धोका
च् अमेरिकी अधिकाºयाने म्हटले की, ५जी हे केवळ तंत्रज्ञानाचे अद्ययावतीकरण नाही. हे संपूर्ण नवे तंत्रज्ञान आहे. यातील तंत्रज्ञान केवळ दोन व्यक्तीतील बोलण्यापुरते अथवा संपर्कापुरते मर्यादित नाही. यात सर्वसत्तावादी देशांना हेरगिरीची मोठी संधी आहे. अत्यंत गोपनीय डाटाही ५जी सेवादात्यांना हस्तगत होतो. सामान्य नागरिक अथवा कॉर्पोरेट क्षेत्रातील संवेदनक्षम डाटा सरकारला सहज हस्तगत करणे ५जीमुळे शक्य आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान कोणत्या देशाकडून घ्यायचे याचा विचार देशांनी करायला हवा.