चीनचा ऑक्सिजन भारताला नकोच?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 04:36 AM2021-04-24T04:36:29+5:302021-04-24T04:36:48+5:30
भारताचे माैन : अन्य देशांकडे पुरवठ्याबाबत चाैकशी सुरू
लोकमत न्यूज नेटवर
नवी दिल्ली/बीजिंग : कोविड-१९ साथीच्या उद्रेकाचा सामना करणाऱ्या भारतास ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याची तयारी चीनने दाखविली आहे. मात्र, भारताने चीनच्या प्रस्तावास अद्याप होकार दिलेला नाही. ऑक्सिजनसाठी भारताचा इतर देशांकडे शोध सुरू आहे.
ऑक्सिजनच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारत आता इतर देशांकडून मदत घेण्याच्या तयारीत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने मागील आठवड्यात म्हटले होते. त्यानंतर चीनने मदत देण्याची तयारी दर्शविली होती. तथापि, भारत सध्या तरी चीनकडून ऑक्सिजन अथवा इतर मदत घेणार नाही, असे समजते.
चीनऐवजी सिंगापूर आणि आखाती देशांकडून ऑक्सिजन मिळविता येऊ शकतो का, हे भारत तपासून पाहत आहे. भारत ज्या देशांकडून मदत घेणार आहे, त्या देशांच्या यादीत चीनचा समावेश नाही, असे सूत्रांनी सांगितले.
चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे की, कोरोना हा संपूर्ण मानवजातीचा शत्रू असून त्याच्या मुकाबल्यासाठी आंतरराष्ट्रीय एकजूट आणि परस्पर सहकार्य आवश्यक आहे.
भारतातील कोरोना स्थितीवर चीनचे लक्ष असून वैद्यकीय उपकरणांच्या टंचाईची आम्ही दखल घेतली आहे. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीन भारताला शक्य ती मदत करण्यास तयार आहे. भारताने गेल्यावर्षी चीनकडून वैद्यकीय उपकरणे मागवली होती. तथापि, यातील बहुतांश आयात ही व्यावसायिक करारानुसार करण्यात आली होती.
गेल्या वर्षांपासून भारत आणि चीन यांचे संबंध बिघडले आहेत. गतवर्षी चीनने प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसक संघर्षही झडला
होता.
फ्रान्सचीही तयारी
फ्रान्सनेही भारताला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतासोबत आम्ही बंधुभाव व्यक्त करीत आहे. या संघर्षात आम्ही तुमच्यासोबत आहोत. सर्व प्रकारची मदत करण्यास आम्ही तयार आहोत.