डॉ. दातार यांच्या प्रयत्नांमुळे २० कर्मचाऱ्यांची सुटका; १४ भारतीय येमेनमध्ये अडकले होते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 02:46 AM2020-12-04T02:46:09+5:302020-12-04T11:08:50+5:30
ओमानस्थित एका परदेशी जहाज वाहतूक कंपनीत काम करण्यासाठी हे २० जण जानेवारीत मस्कतला गेले होते.
मुंबई : गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून येमेनमध्ये कैदेत अडकलेल्या २० जहाज कर्मचाऱ्यांची अखेर सुखरूप सुटका झाली आहे. यामध्ये १४ भारतीय, ५ बांगलादेशी व एका इजिप्शियन नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी दुबईतील अल अदिल ट्रेडिंग समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. डॉ. दातार यांनी स्वतःतर्फे मदत म्हणून या भारतीय कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २० हजार रुपये मदत हस्तांतरित केली आहे.
चालू आठवड्याच्या अखेरीस हे १४ भारतीय एडनहून मुंबईला परतण्याची अपेक्षा आहे. येमेनमध्ये सध्या भारताचा दूतावास नसल्याने शेजारच्या जिबोती देशातील भारतीय दूतावास या कर्मचाऱ्यांना तात्पुरते पासपोर्ट, तसेच येमेनी प्रशासनातर्फे व्हिसा मंजुरी मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील आहे.
ओमानस्थित एका परदेशी जहाज वाहतूक कंपनीत काम करण्यासाठी हे २० जण जानेवारीत मस्कतला गेले होते. १२ फेब्रुवारीला जहाजाला खराब हवामानामुळे एका जागी थांबावे लागले. दुर्दैवाने ती जागा येमेनच्या युद्धप्रवण क्षेत्रात होती. येमेनी तटरक्षकांनी कर्मचाऱ्यांना अटक केली. डॉ. दातार यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नीलेश लोहार म्हणाले, डॉ. दातार यांनी आम्हाला परतीच्या प्रवासासाठी आर्थिक आधार पुरवला आहे. त्यांचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. जहाज कर्मचाऱ्यांत महाराष्ट्रातील कोल्हापूरचे संदीप बाळू लोहार, नीलेश धनाजी लोहार, फिरोज नसरुद्दीन झारी आदींचा समावेश आहे.
आतापर्यंत ५ हजार भारतीयांची केली सुटका
डॉ. धनंजय दातार यांनीही या कर्मचाऱ्यांच्या सुटकेबद्दल आनंद प्रकट केला आहे. ते म्हणाले, ‘आतापर्यंत कोरोनाच्या साथीमुळे आखाती देशांत अडकलेल्या ५,००० हून अधिक भारतीयांना आमच्या अल अदिल कंपनीने सर्व खर्च उचलून सुखरूप घरी पोहोचवले आहे. सौदी अरेबियातही तुरुंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. जिबोतीमधील भारतीय राजदूत अशोक कुमार आणि निवृत्त भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचा आभारी आहे.