Imran khan: गरज सरो! पाकिस्तानचा अण्वस्त्र जन्मदाता मरणाच्या दारात; इम्रान खानने विचारले पण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 12:41 PM2021-09-13T12:41:29+5:302021-09-13T12:42:52+5:30
Dr Abdul Qadeer khan Death Rumors: अब्दुल कादिर यांनी डॉनला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान सरकारवर आरोप केला आहे. परिस्थिती एवढी वाईट झाली की, अब्दुल कादिर खान यांना व्हिडीओ जारी करून जिवंत असल्याचे सांगावे लागले.
इस्लामाबाद : जगभरात बदनाम असलेले आणि अणुबॉम्बचे तंत्रज्ञान चोरलेले पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक अब्दुल कादिर खान (Abdul Qadeer khan) यांना आता पश्चाताप होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे ते मरायला टेकले होते, हॉस्पिटलमध्ये असताना त्यांची पंतप्रधान इम्रान खाननेच (Imran khan) नाही तर सरकारमधील एकाही माणसाने साधी विचारपूसही केली नाही. यामुळे अब्दुल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Dr Abdul Qadeer disappointed with PM Imran for not inquiring after his health)
अब्दुल कादिर यांनी डॉनला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान सरकारवर आरोप केला आहे. मी देशाच्या संरक्षणासाठी एवढे केले परंतू मी मरणाच्या दारात असताना इम्रान खाननेची नाही तर मंत्रिमंडळातील एकानेही माझी साधी विचारपूसही केली नाही. सर्व देश माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होता, शुक्रवारी तर माझा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याचे ते म्हणाले.
परिस्थिती एवढी वाईट झाली की, अब्दुल कादिर खान यांना व्हिडीओ जारी करून जिवंत असल्याचे सांगावे लागले. कोरोनामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेते शहबाज शरीफ यांनी अब्दुल कादिर खान यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या अणुबॉम्ब निर्माण कार्यक्रमाचे जनक राहिलेल्या कादिर खानना अण्वस्त्रे प्रसाराचे आरोप झाल्याने पदावरून हटविण्यात आले होते. 1998 मध्ये पाकिस्तानने भारताशी स्पर्धा करण्यासाठी पहिल्यांदा अणुबॉम्बची चाचणी घेतली होती. पदावरून हटविल्यानंतर खान यांना पाकिस्तानने मोठी सुरक्षा देत साऱ्या घडामोडींपासून बाजुला केले होते. ते आजपर्यंत दुर्लक्षितच आहेत. कादिर खानने इराण, लिबिया आणि उत्तर कोरियासारख्या देशांना अणुबॉम्ब बनविण्याचे तंत्रज्ञान दिले होते.