कोरोना विरोधी बहुतांश लसी डेल्टा व्हेरिअंटवर प्रभावी, अमेरिकी वैज्ञानिक म्हणाले लवकरात लवकर लस घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 09:27 PM2021-07-02T21:27:28+5:302021-07-02T22:42:14+5:30
जगातील अनेक देश सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा सामना करत आहेत आणि काही ठिकाणी या व्हेरिअंटच्या आणखी एका लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जगातील अनेक देश सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा सामना करत आहेत आणि काही ठिकाणी या व्हेरिअंटच्या आणखी एका लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात अमेरिकेचे मुख्य सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनी गुरुवारी कोरोना विरोधी बहुतेक लसी वेगानं पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात प्रभावी असल्याचं म्हटलं आहे. यासोबत त्यांनी नागरिकांना जितकं लवकर होईल तितक्या लवकर लसीकरण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
व्हाइट हाऊसच्या कोविड-१९ कृतीदल आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. फौसी यांनी महत्वाची माहिती यावेळी दिली. इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार फायझर-बायो अँड टेकची लस डेल्टा व्हेरिअंटवर ९६ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर अॅस्ट्राझेनेकाच्या दोन लसी रुग्णालयात दाखल होण्याविरोधात ९२ टक्के प्रभावी ठरली आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनचा 'सिंगल डोस'चा दावा
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं केवळ एक डोस घ्यावा लागेल अशा लसीची निर्मिती केली आहे. या लसीचा इम्युनिटी सिस्टमवर जवळपास आठ महिने प्रभाव राहतो असा दावा करण्यात आला आहे. तसंच या लसीची कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटवरही चाचणी करण्यात आली आहे. यात पहिल्या चाचणी आठ जणांना जॉन्सन अँड जॉन्सन लसीचे डोस देण्यात आले आहे. तर दुसरी चाचणी बोस्टन रुग्णालयात लस घेतलेल्या २० जणांचीही चाचणी करण्यात आली. यात जॉन्सनची लस कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटवर देखील प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.
कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट सर्वात धोकादायक
येत्या काळात कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट सर्वात धोकादायक व्हेरिअंट ठरू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेलं आहे. सध्या डेल्टा व्हेरिअंट जगात ९६ देशांमध्ये पसरला असून डॉ. फौसी यांनी डेल्टा व्हेरिअंटला आजवरचा सर्वात खतरनाक व्हेरिअंट संबोधलं आहे. डेल्टा व्हेरिअंटमध्ये एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संसर्ग होण्याची सर्वाधिक क्षमता आहे. याशिवाय आरोग्यावर याचा घातक परिणाम होतो, असंही डॉ. फौसी यांनी म्हटलं आहे.