Dr Ravi Godse on Omicron: ओमायक्रॉन म्हणजे नॉनसेंस! असे का बोलले डॉ. रवी गोडसे...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 08:59 PM2021-12-27T20:59:46+5:302021-12-27T21:10:08+5:30
Dr Ravi Godse on Omicron: रवी गोडसेंनी, बुस्टर डोस घ्यावा की न घ्यावा, १८ वर्षांखालील मुलांना लस द्यावी की न द्यावी यावर आपले मत मांडले होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून भारतीयांना वेगवेगळ्या सूचना, माहिती देणारे अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे काही दिवसांपूर्वीच भारतात, म्हणजेच मुंबईत येऊन गेले. यावेळी त्यांनी ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणार नाही, असा दावा केला होता. आता ते ओमायक्रॉन म्हणजे नॉनसेंस, असे ट्विट केले आहे. असे का बोलले डॉ. रवी गोडसे, चला जाणून घेऊया त्यांना काय वाटतेय ते.
Omicron is nonsense!
— DrRavi (@DrGodseRavi1) December 27, 2021
कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट संपविण्यासाठी काय करावे लागेल याविषयी, कोरोनाची लागण कशी होते, काय लक्षणे आहेत, कसे बरे होता येईल आदी अनेक विषयांवर डॉ. रवी गोडसे गेल्या दोन वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत. कोरोनाची लस का घ्यावी, काय परिणाम होईल आदीची देखील त्यांनी वेळोवेळी माहिती दिली आहे.
रवी गोडसे यांनी २२ डिसेंबरला एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणार नाही, कारण ओमायक्रॉन हा मोठा झिरो ठरणार आहे, म्हणजेच काहीच होणार नाही, असे गोडसे यांनी म्हटले होते. कोरोनाच्या आधीच्या व्हेरिअंटला गंभीरतेने घेणारे गोडसे यांनी ओमायक्रॉनला सुरुवातीपासून हलक्यात घेतले आहे. ओमायक्रॉन हा शक्तीहीन व्हायरसचा व्हेरिअंट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
यानंतर रवी गोडसेंनी, बुस्टर डोस घ्यावा की न घ्यावा, १८ वर्षांखालील मुलांना लस द्यावी की न द्यावी यावर आपले मत मांडले होते. जर तुम्हाला बुस्टर डोस घ्यायचा असेल तर घ्या, पण तुमची झोप उडवून घेऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला होता. १८ वर्षांखालील मुलांना कोरोनाविरोधी लस न दिल्याने आपले नुकसान होऊ शकते, पण ओमायक्रॉ़न हा कमकुवत आहे, त्यामुळे आपण सुरक्षित राहू. तिसरी लाट येणारच नाही, असे ते म्हणाले होते. त्यापूर्वी त्यांनी ''ओमायक्रॉन को रोकना मुश्किलही नहीं बल्कि नामुमकिन हैं , लेकिन ओमायक्रॉन ‘डॉन’ नहीं , भारत का ‘विजय' होगा !'', असे म्हटले होते.
तसेच ओमायक्रॉन हा आफ्रिकेने निर्माण केलेली लस बनेल, भारतासाठी बुस्टर आणि महामारी संपेल, असे गोडसे म्हणाले होते. या साऱ्याचा अर्थ असा की ओमायक्रॉनबाबत उगाचच बाऊ केला जात आहे. तो वेगाने पसरत असला तरी त्याची ताकद खूप कमी आहे. कोरोनाची लस घेतल्यास ओमायक्रॉन पळून जाईल, असे त्यांना या सर्व ट्विटमधून लोकांना सांगायचे आहे.