ड्रॅगनच्या 'बड्या घरचा, पोकळ वासा'; शहरांवर कर्जाचे डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 08:57 AM2018-08-16T08:57:28+5:302018-08-16T08:58:34+5:30
विकासकामे ठप्प
बिजिंग : भारताला नेहमी आव्हाने देत असणारा चीन जगातील अनेक देशांमध्ये आपला व्यापार वाढविण्यासाठी धडपडत आहे. पाकिस्तानसह आशिया खंडातील इतर देशांना पैशांची खिरापत वाट असला तरीही चीनमधील अनेक शहरांमध्ये पैसे नसल्याने विकासकामे ठप्प झालेली आहेत. हुनान प्रांताच्या चांगदी येथील शहरांची अवस्था बिकट बनली आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार चीनमध्ये आर्थिक संकट मोठ्या प्रमाणावर उभे ठाकले असून यामुळे बरेच सरकारी प्रकल्प ठप्प झाले आहेत. काही काळापूर्वी चांगदीमध्ये रस्त्यांचे निर्माण वेगात करण्यात आले. मात्र, आता या कामांची स्थिती खूप मंदावली आहे. चांगदी हे एकमेव शहर आर्थिक समस्यांमध्ये गुरफटलेले नसून अन्य शहरेही यात आहेत. या शहरांच्या प्रशासनांना स्टेट बँकिंग व्यवस्थेकडून मोठ्या प्रमाणावर कर्जे वाटली गेली. या पैशांतून या स्थानिक प्रशासनांनी पायाभूत सुविधांवर मोठा खर्च केला. मात्र, हे कर्ज फेडण्यास ही शहरे असमर्थ बनली आहेत.
कर्जाच्या पैशातून रस्ते, पूल, विमानतळ, रेल्वे, गगनचुंबी इमारती आणि खेळांची अद्ययावत मैदाने यांच्यावर मोठा खर्च करण्यात आला. यामुळे मागील दशकात चीनचा विकास वेगाने झाला खरा मात्र, हे केल्यामुळे बिजिंगवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. 2017 मध्ये चीनच्या विकास दराच्या तब्बल 256 टक्के कर्ज वाढले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापार युद्धचा सामनाही चीनला करावा लागत आहे. यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आर्थिक संकट कमी करण्यासाठी एकूण अर्थव्यवस्थेच्या प्रमाणानुसार कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र, ते अशक्य दिसत आहे. कारण शहरांचा विकास करण्यासाठी निधी द्यावाच लागणार आहे.