पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:13 PM2024-10-24T18:13:26+5:302024-10-24T18:13:53+5:30
BRICS मध्ये सामील होण्याच्या पाकिस्तानच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.
BRICS 2024 : रशियात आयोजित ब्रिक्स शिखर परिषद संपल्यामुळे यंदाही पाकिस्तानचे या संघटनेत सामील होण्याचे स्वप्न भंगले आहे. चीन आणि रशियाचा पाठिंबा असूनही पाकिस्तानला ब्रिक्स गटात प्रवेश मिळाला नाही. ब्रिक्स संघटनेच्या नव्या भागीदार देशांच्या यादीतही पाकिस्तानला स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे, तुर्कस्तानचा या भागीदार देशांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानने गेल्या वर्षी ब्रिक्स सदस्यत्वासाठी औपचारिक अर्ज केला होता.
चीनचे पाकिस्तानला आश्वासन
ब्रिक्समध्ये पाकिस्तानचा समावेश करण्याचे आश्वासन चीनने दिले होते, पण ब्रिक्सच्या भागीदार देशांच्या यादीतही पाकिस्तानला स्थान मिळाले नाही. ब्रिक्समध्ये पाकिस्तानचा समावेश करण्याला चीन आणि रशियाने पाठिंबा दिला होता. पण, पाकिस्तानच्या ब्रिक्समधील प्रवेशावर भारत फारसा समाधानी नव्हता, त्यामुळे यंदा पाकिस्तानचा यात समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, भारत या गटाचा संस्थापक सदस्य आहे. सुरुवातीला या गटात ब्राझील (बी), रशिया (आर), भारत (आय), चीन (सी) आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला सामील करण्यात आले होते.
पीएम मोदींचा रशिया-चीनला पाकिस्तानबाबत संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ब्रिक्समधील आपल्या संबोधनात म्हटले की, भारत ब्रिक्समध्ये आणखी 'भागीदार देशांचे' स्वागत करण्यास तयार आहे, परंतु यासंदर्भातील निर्णय सर्वानुमते घेतले पाहिजेत. 16 व्या ब्रिक्स परिषदेत, पंतप्रधान मोदींनी 9 सदस्यीय गटात पाकिस्तानच्या प्रवेशासाठी रशिया आणि चीनच्या समर्थनासंदर्भात इशाऱ्यांमध्ये आपला थेट संदेश दिला. ब्रिक्सच्या संस्थापक सदस्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ब्रिक्सच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स सदस्यांना दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्या शक्तींचा सामना करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आणि या मुद्द्यावर दुटप्पीपणाला जागा नसल्याचे म्हटले. दरम्यान, ब्रिक्स नवीन सदस्यांना केवळ सहमतीने प्रवेश देते, म्हणून हे स्पष्ट होते की, पाकिस्तानच्या सदस्यत्वाला भारताच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. रशिया आणि चीनच्या मदतीने पाकिस्तान ब्रिक्समध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल, अशी आशा बहुतांश पाकिस्तानी नेत्यांना होती, पण तसे होऊ शकले नाही. अपेक्षेप्रमाणे भारताने पाकिस्तानचा या गटात समावेश करण्यास सहमती दर्शवली नाही.
पाकिस्तानने गेल्यावर्षी अर्ज केला होता
पाकिस्तानने गेल्या वर्षी ब्रिक्स सदस्यत्वासाठी औपचारिक अर्ज केला होता. BRICS मध्ये सामील होऊन पाकिस्तानला जगातील प्रभावशाली अर्थव्यवस्थांसोबत आपली युती मजबूत करायची आहे. BRICS मध्ये सामील होऊन पाकिस्तानला आर्थिक आणि राजनैतिकदृष्ट्या खूप फायदा होईल. पण हे भारतासाठी कोणत्याही प्रकारे फायदेशीर नाही, कारण दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध किमान गेल्या पाच वर्षांपासून सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. पाकिस्तानविरोधात दहशतवादाच्या मुद्द्यावर लढा देणाऱ्या भारताला या आघाडीवर त्याच्याशी कोणतेही संबंध नको आहेत आणि ब्रिक्स परिषदेतील भारताच्या भूमिकेने हे स्पष्ट केले आहे.