बापरे! एका कबुतराला मारण्याची शिक्षा 5,84,220 रुपये; काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 01:31 PM2023-12-24T13:31:52+5:302023-12-24T13:32:22+5:30
जपानमध्ये पक्ष्यांना विशेष कायदेशीर संरक्षण मिळाले असून कबुतरही या कायद्याच्या कक्षेत येतात.
जगातील अनेक देशांमध्ये कबूतर ही एक मोठी समस्या बनली आहे. रोग पसरवण्यापासून अनेक गोष्टीसाठी कबुतराला जबाबदार धरले जात आहे. जपानही यापासून मागे नाही. मात्र जपानमध्ये पक्ष्यांना विशेष कायदेशीर संरक्षण मिळाले असून कबुतरही या कायद्याच्या कक्षेत येतात. जपानच्या वन्यजीव कायद्यानुसार, कबूतर किंवा इतर पक्षी घरातून किंवा बाल्कनीतून हाकलून लावता येत नाहीत किंवा पक्ष्यांची अंडी आणि घरट्यांशी छेडछाड करता येत नाही.
कायद्यानुसार, जर तुम्हाला तुमच्या घरातून, बाल्कनीतून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून कबुतर उसकवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. वाहनचालकांसाठीही विशेष मार्गदर्शक तत्त्वे आहेत. कायद्यानुसार कबुतरे बसली असतील किंवा रस्ता ओलांडत असतील तर ट्रॅफिक सिग्नल हिरवा असला तरीही चालकाला आपले वाहन थांबावे लागेल.
सध्या एका प्रकरणाच्या निमित्ताने जपानमध्ये या कायद्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या महिन्यात 3 डिसेंबर रोजी एका 50 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो रस्ता ओलांडत होता, ट्रॅफिक सिग्नलही हिरवा होता, पण त्याच दरम्यान कबुतरांचा कळप रस्त्यावर आला. असे असतानाही चालकाने ब्रेक लावला नाही, उलट वेग वाढवला. यामुळे एका कबुतराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या कबुतराचे शवविच्छेदन करण्यात आले. कबुतराचा मृत्यू ट्रॉमा व शॉकमुळे झाल्याचे पशुवैद्यकांनी सांगितले.
1 मिलियन येन दंड किंवा 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा
जपानच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, या प्रकारच्या गुन्ह्यासाठी एक मिलियन जपानी येन (सुमारे 5,84,220 रुपये) दंड किंवा 1 वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे. अशा परिस्थितीत चालकाला शिक्षा किंवा दंड भरावा लागू शकतो. दरम्यान, जपानमध्ये 2021 आणि 2022 मध्ये स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनंतर सुमारे 4000 कबुतरे मारली गेली किंवा त्यांची अंडी आणि घरटी काढून टाकण्यात आली होती.