गाडी चालवायला होती बंदी ? -तिने थेट क्रेनच उचलली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 08:01 AM2022-02-22T08:01:57+5:302022-02-22T08:02:28+5:30

अगदी काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट. सौदी अरेबियामध्ये महिलांना गाडी चालवायला बंदी होती. एखादीनं गाडी चालवायचा प्रयत्न केला, तर तिला अटक केली जायची, भर चौकात फटकेही दिले जायचे.

driving was not allowed in Saudi Arabia girl started operating craine driving know more inspirational story | गाडी चालवायला होती बंदी ? -तिने थेट क्रेनच उचलली!

गाडी चालवायला होती बंदी ? -तिने थेट क्रेनच उचलली!

Next

अगदी काही वर्षांपूर्वीचीच गोष्ट. सौदी अरेबियामध्ये महिलांना गाडी चालवायला बंदी होती. एखादीनं गाडी चालवायचा प्रयत्न केला, तर तिला अटक केली जायची, भर चौकात फटकेही दिले जायचे. सौदीच्या महिलांनी यासंदर्भात बराच संघर्ष आणि आंदोलनं केल्यानंतर त्यांना गाडी चालवायची परवानगी मिळाली. महिलांवरील गाडी-बंदी उठली. असं असलं तरी महिलांना गाडी चालवायला पूर्वीप्रमाणेच बंदी घालावी, अशी मागणी आणि आंदोलनं सौदीत अजूनही कमी झालेली नाहीत. अशा परिस्थितीत सौदीतील एका तरुण महिलेनं केवळ सौदी किंवा अरब देशांतच नव्हे, तर संपूर्ण जगात पहिली महिला क्रेन ड्रायव्हर बनायचा बहुमान मिळवला आहे. मरियन अल-बाज असं या तीसवर्षीय महिलेचं नाव आहे. ‘दिरिया ई-प्रिक्स’ या यंदाच्या कार रेसिंगमध्ये क्रेनचालक म्हणून ‘रिकव्हरी मार्शल’ बनण्याचा बहुमान तिला मिळाला. यामुळे कार रेसिंगमध्ये ती जगातील पहिली महिला क्रेनचालक’ बनली आहे, पण तिचा संघर्ष खूप मोठा होता.

बायकांनी गाडी चालवू नये, म्हणून आंदोलन करणारे पुरुष काय दावा करतात?.. - तर महिलांनी गाडी चालविल्यास देशात वेश्याव्यवसाय वाढेल, पोर्नोग्राफी आणि समलैंगिकतेमध्ये वाढ होईल, एवढंच नव्हे, तर घटस्फोटांची संख्याही वाढेल, त्यामुळे महिलांना गाडी चालवू देऊ नये, असं या पुरुषांचं म्हणणं आहे. सौदीमध्ये मुळात टॅक्सी कमी, शिवाय महिलांनी टॅक्सीतून कुठे बाहेर जाणं आणखी दुर्मिळ. त्यामुळे गाडीमधून जातानाही महिलेच्या सोबत तिचा पती किंवा जवळचा नातेवाईक असण्याची सक्ती होती.

२०१८ मध्ये गाडी चालविण्याची महिलांवरील बंदी उठली, पण त्याआधी काही दिवसांपूर्वी शायमा जस्तानी ही महिला रस्त्यावर गाडी चालविताना ‘पकडली’ गेली. त्यामुळे तिला दंड तर झालाच, पण तिला जाहीरपणे चाबकाचे फटकेही मारण्यात आले. विशेष म्हणजे या महिलेकडे गाडी चालविण्याचं इंटरनॅशनल लायसन्स होतं! 

अशा स्थितीत मरियमचं ‘जगातील पहिली महिला क्रेन ड्रायव्हर’ बनणं विशेष महत्त्वाचं ठरतं. कार, क्रेन या गोष्टी तर ती सहजपणे चालवतेच, पण कार रेसिंगमध्ये भाग घेते, पण ‘मेकॅनिक’ म्हणून गाड्या दुरुस्तही करते. त्याचं औपचारिक शिक्षण वगैरे काहीच तिनं घेतलेलं नाही. तिचं जे काही ज्ञान आहे, ते सारं स्वत:च्या प्रयत्नाने मिळवलेलं! तिनं शिक्षणही घेतलं आहे, ते मानसशास्त्र आणि मीडिया या विषयात! 

लहानपणापासून तिला गाडीचं प्रचंड आकर्षण होतं. तिच्या वडिलांकडे एक अतिशय जुनीपुराणी गाडी होती. ही  सतत बंद पडायची, पण त्याची दुरुस्ती ते स्वत:च करायचे. त्यांची ही दुरुस्ती चाललेली असताना, त्यावेळी १०-१२ वर्षांची असलेली ही चिमुरडी वडिलांजवळ येऊन बसायची आणि अतिशय बारकाईनं, ते काय करतात, गाडीची दुरुस्ती कशी करतात, हे न्याहाळायची. त्या वयात तिला गाडी चालवता येत नव्हती, त्यासाठीचं तिचं वयही नव्हतं आणि त्याविरोधात कायदा तर होताच, पण ही चिमुरडी त्या वयातही गाडी दुरुस्त करायला शिकली होती. ‘सेल्फ मेड कार मेकॅनिक’ बनली होती. कोणतीही गाडी दुरुस्त करता येईल, इतका आत्मविश्वास तिला आला होता. त्यातूनच गाडीची तिची आवड आणखी वाढत गेली. वडिलांनीही तिला ‘हे कर, ते करू नको’, असं कधीही सांगितलं नाही.

मरियन म्हणते, ‘‘माझं उच्च शिक्षण झालेलं असलं आणि मी त्यात करिअर करू शकत असले, तरी मी भविष्यातही स्वत:ला गाडीच्या जगातच पाहते. कार रेसिंगमध्ये ‘रिकव्हरी मार्शल’ची जबाबदारी खूपच मोठी आहे. भयानक वेगानं कार पळत असताना ‘सर्किट’मध्ये अपघात होण्याचा संभव असतोच. अशावेळी तुम्ही ट्रॅकजवळ असणं, लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त कार क्रेननं उचलणं, मागून भरधाव वेगात येणाऱ्या कार्ससाठी रस्ता मोकळा करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. नाही तर पुन्हा अपघात होऊ शकतात. शिवाय रेसवरही त्याचा परिणाम होतोच. या क्षेत्रात संपूर्ण जगात पुरुषांचीच मक्तेदारी असली तरी, मी कुठेही कमी पडणार नाही, हे मला नक्की माहीत आहे. कारण माझं ‘बेसिक’ खूप पक्कं आहे आणि त्याचं बाळकडू मला घरातूनच वडिलांकडून मिळालं आहे!’’ मरियनला भविष्यात ‘कार इन्स्ट्रक्टर’ तर बनायचं आहेच, पण स्वत:चं कार रिपेअरिंगचं गॅरेजही तिला टाकायचं आहे. महिलांना एक नवा मार्ग तिला दाखवायचा आहे.

मध्यपूर्वेतील पहिली ट्रेन ड्रायव्हर !
संपूर्ण जगभरातच महिला क्रेन ड्रायव्हर्सची संख्या अत्यल्प आहे, त्याप्रमाणेच महिला ट्रेन ड्रायव्हरही हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्याच आहेत. मरिअम अल् सफर ही त्यातलीच एक. काही वर्षांपूर्वी ती केवळ दुबईतली, संयुक्त अरब अमिरातीमधीलच नव्हे, तर संपूर्ण मध्य पूर्वेतील पहिली महिला ट्रेन ड्रायव्हर ठरली होती. मेट्रो ट्रेन चालक म्हणून महिलांसमोर एक नवा पायंडा तिनं पाडला होता.

Web Title: driving was not allowed in Saudi Arabia girl started operating craine driving know more inspirational story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.