इस्रायली PM बेंजामिन नेतन्याहूंच्या घरावर हल्ला; सुरक्षा यंत्रणा भेदून घुसले ड्रोन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:10 PM2024-10-19T14:10:36+5:302024-10-19T14:36:22+5:30

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.

Drone attack on Israeli PM Benjamin Netanyahu house Hezbollah suspected of attack | इस्रायली PM बेंजामिन नेतन्याहूंच्या घरावर हल्ला; सुरक्षा यंत्रणा भेदून घुसले ड्रोन

इस्रायली PM बेंजामिन नेतन्याहूंच्या घरावर हल्ला; सुरक्षा यंत्रणा भेदून घुसले ड्रोन

Israel Hezbollah War:इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या खाजगी निवासस्थानाला लक्ष्य करण्यासाठी हिजबुल्लाहने ड्रोन हल्ला केला आहे.  हिजबुल्लाहने लेबनॉनमधून इस्त्रायली इमारतीवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याच्या माध्यमातून पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इस्रायलमधील हैफा सीझेरिया भागात हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आता इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये सुरु असलेलं युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. इस्रायलने हमासच्या प्रमुखाची हत्या केल्यानंतर आता हिजबुल्लाहने थेट बेंजामिन नेतन्याहू यांना लक्ष्य केलं आहे.

इस्त्रायली लष्कराने दावा केला की, शनिवारी लेबनॉनच्या एका ड्रोनने सिझेरिया भागात घुसून पंतप्रधान नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. या ड्रोनमुळे एका इमारतीवरही स्फोट झाला. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत माहिती देताना पंतप्रधान नेतान्याहू यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधानांच्या घराच्या दिशेने ड्रोन सोडण्यात आले. पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी तिथे नव्हते आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरीकडे इस्त्रायली सुरक्षा दलांनी या हल्ल्याला दुजोरा दिला असून ड्रोन मोकळ्या जागेत पडले असून त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले आहे. 

लेबनॉनमधून तीन ड्रोन सोडण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाकडून देण्यात आली. यापैकी एक ड्रोन हल्ला मध्य इस्रायलच्या सीझरिया शहरातील एका घराला लक्ष्य करून करण्यात आला. तर दुसरा ड्रोन हल्ला पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराजवळ झाला. मिळालेल्या माहितीवरून हे ड्रोन थेट आपल्या लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम होते. इस्त्रायली सुरक्षा दलांनी कबूल केले की ड्रोन हल्ला रोखण्यात त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा अपयशी ठरली, ज्यामुळे हा हल्ला झाला. सुरक्षा यंत्रणेला छेदून ड्रोनने त्यांच्या हद्दीत प्रवेश केला.

धक्कादायक बाब म्हणजे हैफाच्या बाहेरील भागात एक ड्रोन इस्त्रायलच्या लष्करी हेलिकॉप्टरच्या शेजारी उडत होता. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, तीन ड्रोन लेबनॉनहून हैफाच्या दिशेने आले होते, त्यापैकी फक्त दोन ड्रोनची माहिती मिळाली आणि त्यांना रोखण्यात आलं. तिसऱ्या ड्रोनने सीझेरियातील एका इमारतीवर अचूक हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की ड्रोनचा स्फोट खूप जोरदार होता. ड्रोनने लेबनॉनपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावरून उड्डाण केले आणि थेट सीझेरियामधील एका इमारतीला धडकले. ड्रोनने इस्रायलच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर उत्तर तेल अवीवमधील ग्लिलॉट वसाहतीमधील लष्करी तळांवर सायरन वाजू लागले. इस्त्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार हल्ला करण्यापूर्वी ड्रोन एक तास आधी इमारतीच्या वरती घिरट्या घालत होते.

 

Web Title: Drone attack on Israeli PM Benjamin Netanyahu house Hezbollah suspected of attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.