सीरियातील लष्करी अकादमीवर ड्रोन हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 01:55 PM2023-10-06T13:55:56+5:302023-10-06T13:56:25+5:30
Drone attack : सीरियातील लष्करी अकादमीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियातील लष्करी तळांवर झालेल्या आतापर्यंतच्या हल्ल्यामधील हा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे.
सीरियातील लष्करी अकादमीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियातील लष्करी तळांवर झालेल्या आतापर्यंतच्या हल्ल्यामधील हा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, सीरियाचे संरक्षण मंत्री लष्करी अकादमीमध्ये एका पदवीदान सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. ते तिथून निघून गेल्यानंतर काही वेळातच घटनास्थळावर ड्रोनच्या माध्यमातून बॉम्बफेक करण्यात आली. सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, होम्स प्रांतामध्ये लष्करी अकादमीवर झालेल्या हल्ल्यात नागरिकांसह सैनिकांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्याची जबाबदारी अद्यापतरी कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही. सीरियाच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याला पूर्ण शक्तीनिशी प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. सीरियाच्या सैन्यदलांनी इदबिल परिसरामध्ये मोठ्या प्रमामावर बॉम्बफेक केली. अकादमीमध्ये सजावटीचं काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, समारंभ आटोपल्यानंतर लोक मोकळ्या जागेत गेले. तेव्हाच हा हल्ला करण्यात आला. हे ड्रोन कुठून आले ते आम्हाल कळले नाही. मात्र हल्ला झाल्यानंतर जमिनीवर मृतदेह पडले होते.
रॉयटर्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानुसार एका मोठ्या जागेवर लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. स्फोटामुळे काही मृतदेह जळत होते. तर काही मृतदेहांना आगीने घेरले होते. चहुबाजूला आरडाओरडा सुरू होता. सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्से सांगितले की, या हल्ल्यामध्ये १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२५ जण जखमी झाले आहेत.