काबूलमध्ये ड्रोन हल्ला; आयसिसच्या हल्लेखारांना संपविल्याचा अमेरिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:05 AM2021-08-30T07:05:55+5:302021-08-30T07:36:40+5:30
अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हल्ल्याची माहिती दिली आहे.
वाॅशिंग्टन/काबूल : काबूल विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिशेब चुकता केल्यानंतर ४८ तासांमध्येच अमेरिकेने एक माेठा हल्ला उधळून लावला आहे. ड्राेनने एअर स्ट्राईक करुन काबूल विमानतळाकडे निघालेल्या काही आत्मघाती हल्लेखाेरांना संपविले. हल्लेखाेर पाकिस्तानशी जवळीक असलेल्या खाेरासान गटाचे हाेते. काबूल विमानतळावर पुढील २४ ते ३६ तासांमध्ये आयसिसकडून आणखी हल्ले हाेण्याचा धोका कायम असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हल्ल्याची माहिती दिली आहे. काबूल विमानतळाजवळ कारमधून हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या काही आत्मघाती हल्लेखाेरांना टार्गेट करण्यात आले. हल्लेखाेर आयसिसच्या खाेरासान गटाचे हाेते. ड्राेनचा वापर करून दुपारच्या सुमारास अमेरिकेने वाहनावर राॅकेटने मारा केला. रॉकेटने त्यांना उडविल्यानंतर वाहनातील स्फाेटकांचाही भीषण स्फाेट झाला. (वृत्तसंस्था)
नंतर अमेरिकेला अधिकार नाहीत : तालिबान
अमेरिकेला ३१ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक करण्याचा अधिकार राहणार नाही. यापुढे असा प्रयत्न राेखण्यात येईल, असे तालिबानने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने दोन दिवसांमध्ये दोन एअर स्ट्राईक केले आहेत.
...तर आणखी एअर स्ट्राइक करू : बायडेन
बायडेन यांनी आणखी एअर स्ट्राईक करण्याचे स्पष्ट केले आहे. काबूल विमानतळावरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १३ अमेरिकन सैनिकांचे पार्थिव अमेरिकेतील डेलवेअर येथे दाखल झाले. बायडेन यावेळी स्वत: उपस्थित होते.
उरले दोन दिवस
अमेरिकेकडे अफगाणिस्तानातून संपूर्ण माघारीसाठी केवळ दाेन दिवस शिल्लक आहेत. अमेरिकेने बचाव माेहिमेचा वेग वाढवला असला तरीही आयसिसकडून काबूल विमानतळाला पुन्हा लक्ष्य केले जाऊ शकते. काही दिवसांपूर्वीच आयसिसने केलेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिकांसह २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला हाेता.
आयसिसच्या खाेरासान गटात अनेक भारतीय
आयसिसच्या खाेरासान गटात अनेक भारतीय सामील असल्याचा दावा संघटनेच्या कमांडरने केला आहे. याच्या हाताखाली ६०० जण असून, त्यात माेठ्या संख्येने पाकिस्तानी व भारतीय आहेत. आम्हाला इस्लामी शरिया कायदा लागू करायचा आहे. अमेरिकेच्या माघारीनंतर अफगाणिस्तानमध्ये आयसिसला पाय पसरणे साेपे होईल, असे तो म्हणाला.