एमिरेट्स एअरलाईन्समधील 'हिंदू मील' बंद होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 09:40 AM2018-07-04T09:40:23+5:302018-07-04T09:43:56+5:30
प्रवाशांकडून मिळणाऱ्या अभिप्रायांनंतर घेतला निर्णय
नवी दिल्ली : जगातील अग्रगण्य विमान कंपनी एमिरेट्सनं त्यांच्या विमानांमधून हिंदू मील हटवण्याचा निर्णय घेतला आहे. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या प्रवाशांना धार्मिक आस्थेनुसार खाद्यपदार्थ पुरवतात. या कंपन्यांच्या विमानांमधून प्रवास करण्याआधी प्रवासी जेवणात कोणते पदार्थ हवेत, याची निवड करु शकतात. मात्र एमिरेट्स एअरलाईन्सनं आता ही सेवा बंद केली आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या अभिप्रायांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
'एमिरेट्सनं हिंदू मीलचा पर्याय बंद केला आहे. आम्ही नेहमी विमानात दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल प्रवाशांचे अभिप्राय घेत असतो. याच आधारावर आमच्याकडून सुविधांबद्दलचे निर्णय घेतले जातात,' असं कंपनीनं प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. 'हिंदू प्रवासी शाकाहारी आऊटलेट्समधून त्यांचं जेवण बुक करु शकतात. या आऊटलेट्सकडून विमानातदेखील जेवण पुरवलं जातं. यामध्ये हिंदू मील, जैन मील, भारतीय शाकाहारी जेवण, बीफ नसलेलं मांसाहारी जेवण असे विविध पर्याय उपलब्ध असतात,' असंही एमिरेट्सनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
हिंदू मील म्हणजे काय?
हे जेवण हिंदू समुदायाच्या प्रवाशांसाठी असतं. शाकाहारी नसलेल्या आणि मांस, मासे, अंड खाणाऱ्या प्रवाशांसाठी हिंदू मील तयार केलं जातं. या जेवणात बीफचा समावेश नसतो. बहुतांश मोठ्या विमान कंपन्या प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा पर्याय देतात. एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाईन्समध्ये धार्मिक जेवणाचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे.