दुबईच्या राजाचा घटस्फोट; पत्नी मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 10:45 AM2022-03-30T10:45:41+5:302022-03-30T10:46:53+5:30

दुबईचे राजे, संयुक्त अरब अमिरातचे उपाध्यक्ष, तसेच पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशीद अल मकदूम आणि त्यांची सहावी पत्नी राजकुमारी हया बिन्त अल हुसेन यांचा नुकताच घटस्फोट झाला.

Dubais Sheikh Mohammed Sets Record 728 Million dollars Divorce Settlement | दुबईच्या राजाचा घटस्फोट; पत्नी मालामाल!

दुबईच्या राजाचा घटस्फोट; पत्नी मालामाल!

googlenewsNext

अनेक हायप्रोफाइल जोडप्यांची प्रेमप्रकरणं, त्यांचे विवाह गाजतात, कर्णोपकर्णी होतात त्याचप्रमाणे त्यांचे घटस्फोटही. किंबहुना त्यांच्या लग्नापेक्षाही घटस्फोटांना अधिक प्रसिद्धी मिळते आणि ते जास्त चवीनं  चघळले जातात, याचं कारण आधी त्यांनी घेतलेल्या प्रेमाच्या जाहीर आणाभाका, त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाचं जाहीर ‘सोशल दर्शन’ आणि त्याच जोडप्यामध्ये बेबनाव आल्यानंतर त्यांच्यात झालेल्या ‘तडजोडी’ची डोळे विस्फारणारी रक्कम! 
विशेषत: घटस्फोटानंतर श्रीमंत जोडीदाराला आपल्या नवरा/बायकोला द्यावी लागलेली रक्कम नुसती ऐकूनही अनेकांचे डोळे विस्फारतात! बिल आणि मिलिंडा गेटस्, जेफ बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट, ॲलेक विल्डनस्टीन आणि जोसलीन, इलॉन मस्क आणि जस्टलिन मस्क, इलॉन मस्क आणि तालुलाह रिले... अशा अनेक जगप्रसिद्ध जोडप्यांचे विवाह जसे गाजले, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी प्रसिद्धी पावले ते त्यांचे घटस्फोट. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी आपल्या पत्नीशी; मॅकेन्झी स्कॉटशी घटस्फोट घेतल्यानंतर आणि तिला ‘तडजोड’ रक्कम दिल्यानंतर तर मॅकेन्झी जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत थेट तिसऱ्या क्रमांकावर जाऊन बसली! 

घटस्फोटामुळे असंच एक जोडपं सध्या जगभर गाजत आहे.. दुबईचे राजे, संयुक्त अरब अमिरातचे उपाध्यक्ष, तसेच पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशीद अल मकदूम आणि त्यांची सहावी पत्नी राजकुमारी हया बिन्त अल हुसेन यांचा नुकताच घटस्फोट झाला. ब्रिटीिश न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार दुबईचे राजे शेख मोहम्मद यांना त्यांची पत्नी हया यांना मुलांचे रक्षण आणि देखभालीपोटी ७३० दशलक्ष डॉलर (सुमारे ५५०० कोटी रुपये) तडजोड म्हणून द्यावे लागणार आहेत. आतापर्यंत घटस्फोट प्रकरणात न्यायालयांनी जे निर्णय दिले आहेत, त्यात ब्रिटनमधील सर्वाधिक तडजोड रकमेच्या यादीत या घटस्फोटाचा समावेश होतो..

मोहम्मद शेख सध्या ७२ वर्षांचे आहेत, तर हया ४७ वर्षांच्या. मोहम्मद शेख हे जगप्रसिद्ध घोडेपालकही आहेत. १९९५ मध्ये दुबईचे ‘क्राऊन प्रिन्स’ म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. सहा बायकांची मिळून त्यांना सोळा मुलं  आहेत. दुर्मीळ वंशाचे जातिवंत घोडे पाळण्याचा त्यांना शौक आहे. या दोघांना दोन मुलं आहेत. अल जालिया १४ वर्षांची आणि झायेद नऊ वर्षांचा. या मुलांना साधारण २९० दशलक्ष पाउंड एवढी रक्कम मिळेल. अर्थात, त्यांच्या आयुष्याची दोरी किती लांब आहे आणि भविष्यात ते त्यांच्या वडिलांशी समेट करतात की नाही, यावर ही रक्कम अवलंबून असेल. याशिवाय देखभालीसाठी राजकुमारी हया यांना दरवर्षी ११ दशलक्ष पाउंड रक्कम देण्यात येईल. न्यायमूर्ती फिलिप मूर यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे की, हया आणि तिच्या दोन्ही मुलांना कडेकोट सुरक्षेची गरज आहे. या मुलांना इतर कोणाहीपेक्षा त्यांच्या वडिलांकडूनच सर्वाधिक धोका आहे.

राजकुमारी हया या जॉर्डनचे दिवंगत राजे हुसेन यांची कन्या आहेत. त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीधर आहेत. त्यादेखील घोड्यांच्या अतिशय शौकीन आणि जाणकार आहेत. इतकंच नाही, सन २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये ‘शो जम्पिंग’ या घोड्यांच्या अडथळ्यांच्या शर्यतीतही त्यांनी भाग घेतला होता.

आपल्याच नवऱ्याकडून आपल्या आणि आपल्या मुलांच्या जीवाला भीती असल्याच्या कारणानं २०१९ मध्ये त्यांनी दुबईतून पलायन केलं होतं आणि तेव्हापासून त्या ब्रिटनमध्ये राहत आहेत. तेव्हापासून त्यांच्यात न्यायालयीन लढाईही सुरू आहे. आपल्या दोन्ही मुलांची कायदेशीर कस्टडी आपल्याला मिळावी, यासाठीही ब्रिटिश न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर ब्रिटिश न्यायालयानं नुकताच अंतिम निकाल दिला आहे.

आपल्या नवऱ्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा राजकुमारी हया यांचा दावा ब्रिटिश न्यायालयानंही मान्य केला होता. हया ब्रिटनमध्ये राहायला आल्या, तरी तिथंही मोहम्मद शेख यांच्याकडून हया यांच्यावर पाळत ठेवली जात होती. त्यांचे आणि त्यांच्या वकिलाचे फोन कॉल्सही मोहम्मद शेख यांच्याकडून टॅप केले जात होते. मोहम्मद शेख यांच्यावर त्यांच्या एका पत्नीची हत्या केल्याचाही आरोप आहे. आपल्या आधीच्या लग्नापासून झालेल्या दोन मुलींनाही त्यांनी घरात कैद केलं होतं, ‘परवानगी’शिवाय कुठंही जाण्यायेण्याची बंदी त्यांच्यावर घालण्यात आली होती. हे सर्व पाहून ब्रिटिश न्यायालयानं मुलांची कस्टडी राजकुमारी हया यांच्याकडं देतानाच हया यांच्या बाजूनं निकाल दिला आहे.

नजरकैदेतलं सहजीवन
मोहम्मद शेख आणि हया हे दोघंही साधारण १५ वर्षे लग्नबंधनात होते; पण त्यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर शेख यांनी हया यांना जवळपास नजरकैदेतच ठेवलं होतं. याचदरम्यान बॉडीगार्ड रसेल फ्लॉवर याच्यावर हया यांचं प्रेम बसलं असं मानलं जातं. दुबईतून पळून जाण्यासही त्यानंच मदत केली. रसेल स्वत: विवाहित होता; पण या प्रेमप्रकरणामुळं त्याचंही लग्न तुटलं, असं म्हटलं जातं. २०१९ मध्ये ब्रिटनमध्ये पोहोचल्यावर शरिया कायद्याच्या मदतीनं त्यांनी आपल्या पतीला तलाक दिला. मोहम्मद शेख यांनी मात्र सगळ्या आरोपांचा इन्कार केला आहे.

Web Title: Dubais Sheikh Mohammed Sets Record 728 Million dollars Divorce Settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.