डोळा लागल्याने उ.कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंडाची शिक्षा
By admin | Published: May 13, 2015 11:16 AM2015-05-13T11:16:12+5:302015-05-13T11:16:26+5:30
भरकार्यक्रमात डोळा लागल्याने उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री ह्योन योंग चोल यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे वृत्त आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
सेऊल, दि. १३ - भरकार्यक्रमात डोळा लागल्याने उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री ह्योन योंग चोल यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे वृत्त आहे. चोल यांना तोफेने उडवण्यात आले असून या अमानूष शिक्षेचा जगभरातून निषेध होत आहे. या वृत्ताला उत्तर कोरियाने दुजोरा दिलेला नाही.
उत्तर कोरियामध्ये राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांचा उन्माद दिवसेगणिक वाढत असून किम जोंग यांच्या हुकूमशाही वृत्तीची नेहमीच चर्चा होत असते. गेल्या महिन्यात एका सरकारी कार्यक्रमात संरक्षण मंत्री ह्योन योंग चोल यांचा डोळा लागला होता. या कार्यक्रमाला किम जोंग उन हेदेखील उपस्थित होते. चोल यांच्या झोपाळूपणाने जोंग भलतेच दुखावले गेल्याचे दक्षिण कोरियातील वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चोल हे अनेकदा किम जोंग यांच्याशी हुज्जत घालतानाही दिसले होते. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी चोल यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याचे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. ३० एप्रिल रोजी उत्तर कोरियाच्या विमानभेदी तोफेने चोल यांना मृत्यूदंडाची अमानूष शिक्षा दिली गेली असा दावाही दक्षिण कोरियाने प्रसारमाध्यमांनी केला आहे.
उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया हे कट्टर वैरी आहेत. दक्षिण कोरियाच्या प्रसारमाध्यमांमधील दावा खोटा असता तर उत्तर कोरिया सरकारने ताबडतोब हा दावा फेटाळून लावला असता. पण उत्तर कोरिया सरकारने अद्याप हे वृत्त फेटाळलेही नाही व त्याला दुजोराही दिलेला नाही. त्यामुळे चोल यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचे वृत्त विश्वसनीय असू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.