अपुऱ्या स्तनपानामुळे भारताला होईल 90 हजार कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 06:39 PM2017-08-02T18:39:31+5:302017-08-02T18:45:02+5:30
वेगवेगळ्या कारणांमुळे तान्ह्या मुलांना स्तनपान करण्याचे प्रमाण गेल्या काही काळात कमालीचे घटले आहे. भारतातही आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रे, दि. 2 - वेगवेगळ्या कारणांमुळे तान्ह्या मुलांना स्तनपान करण्याचे प्रमाण गेल्या काही काळात कमालीचे घटले आहे. भारतातही आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. देशात दरवर्षी सुमारे एक लाख मुलांचा विविध आजारांची शिकार होऊन मृत्यू होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान करण्यात आले तर त्यांच्या मृत्यू टाळता येऊ शकेल. अपुऱ्या स्तनपानामुळे होत असलेल्या आकस्मिक मृत्युमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला तब्बल 14 अब्ज डॉलरचे (सुमारे 89.446 हजार कोटी रुपयांचे) नुकसान होऊ शकते, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
ग्लोबल ब्रेस्टफिडिंग कलेटिव्हच्या सहकार्याने युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल ब्रेस्टफिडिंग स्कोअरकार्डच्या नवा अहवाल तयार केला आहे. स्तनपानामुळे बालमृत्यूची दोन मोठी कारणे असलेल्या अतिसार आणि न्यूमोनिया यांना अटकाव करण्यासाठी मदत मिळते. तसेच महिलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या ओवरी आणि स्तनाच्या कर्करोगापासून महिलांचे संरक्षण होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे.
केवळ चीन, भारत, नायजेरिया, मॅक्सिको आणि इंडोनेशिया या देशांमध्ये अपुऱ्या स्तनपानामुळे दरवर्षी 2 लाख 36 हजार मुलांचा मृत्यू होतो. या मृत्युंमुळे या देशांना येत्या काळात दरवर्षी 119 अब्ज डॉलर सुमारे 7.59 लाख कोटी रुपये एवढे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपेक्षा लहान मुलांना स्तनपानाचे प्रमाण 55 टक्क्यांहून अधिक असूनही भारतात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे, असे हा अहवाल सांगतो. अतिसार आणि न्युमोनियामुळे भारतात दरवर्षी सुमारे 99 हजार 499 मुलांचा मृत्यू होत असतो. या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान केल्यास त्यांचे मृत्यू टाळता येतील.
कमी स्तनपानामुळे तान्ह्या मुलांसोबतच कर्करोग आणि टाइप-2 प्रकारच्या डायबिटीसशी झुंजत असलेल्या महिलांच्या मृत्युमुळेही देशाच्या अर्थव्यवस्थेला 7 अब्ज डॉलर एवढे नुकसान होण्याचा अंदाज आहे. तसेच या नुकसानामुळे देशाच्या जीडीपीमध्ये 0.70 टक्के घट होण्याची शक्यता आहे.