कारगिल घुसखोरीमुळे वाजपेयींच्या पाठीत खंजीर
By admin | Published: February 19, 2016 03:33 AM2016-02-19T03:33:52+5:302016-02-19T03:33:52+5:30
पाकिस्तानी लष्कराची कारगिलमधील घुसखोरी हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या शांतता प्रक्रियेच्या पाठीत खंजीर खुपसणारे कृत्य होते
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराची कारगिलमधील घुसखोरी हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या शांतता प्रक्रियेच्या पाठीत खंजीर खुपसणारे कृत्य होते, अशी कबुली पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भारत आणि पाकमध्ये अभेद्य ऐक्य असण्यावर भर देताना त्यांनी माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला. मुशर्रफांच्या कारगिल दु:साहसामुळेच वाजपेयींनी सुरू केलेली भारत-पाक ऐतिहासिक शांतता प्रक्रिया उधळली गेली होती.
मुशर्रफ यांनी हिंसक मार्गाने काश्मीर स्वतंत्र करू पाहणाऱ्या बिगर सरकारी घटकांना सोबत घेऊन कारगिल दु:साहस केले होते, असेही शरीफ म्हणाले. भारताच्या लडाख जिल्ह्यातील कारगिल भाग मे १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने बळकावला होता. तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत शांतता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर गेल्यानंतर काही दिवसांनीच पाक लष्कराने हे दु:साहस केले होते.
‘माझ्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला आहे, असे वाजपेयी तेव्हा म्हणाले होते आणि ते खरेच होते. मी सुद्धा तेच बोललो होतो. कारगिल दु:साहसाने लाहोर शांतता कराराचा बळी घेतला.