मालीतील ओलीसनाट्य संपुष्टात
By admin | Published: November 21, 2015 04:29 AM2015-11-21T04:29:22+5:302015-11-21T04:29:22+5:30
पश्चिम आफ्रिकेतील माली देशाची राजधानी बमाको येथील रेडिसन ब्लू या लक्झरी हॉटेलात दोन बंदूकधारी ‘जिहादी’ अतिरेक्यांनी आरंभलेले ओलीसनाट्य शुक्रवारी रात्री उशिरा संपुष्टात आले.
बमाको : पश्चिम आफ्रिकेतील माली देशाची राजधानी बमाको येथील रेडिसन ब्लू या लक्झरी हॉटेलात दोन बंदूकधारी ‘जिहादी’ अतिरेक्यांनी आरंभलेले ओलीसनाट्य शुक्रवारी रात्री उशिरा संपुष्टात आले. यात १८ जणांचा बळी गेला. २० भारतीयांसह सर्व ओलिसांची सुरक्षितपणे मुक्तता केल्यानंतर सुरक्षा दलांनी धडक कारवाई करीत दोन्ही अतिरेक्यांचा खातमा केला.
सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी १२.३० वाजता दोन सशस्त्र अतिरेकी हॉटेलात दाखल झाले. त्यांनी हॉटेलात अंदाधुंद गोळीबार करीत तेथे असलेल्यांना ओलीस ठेवले. हा आकडा १७० असल्याचे रेडिसन ब्लू हॉटेल शृंखलेचे मालक ‘रेजिडोर हॉटेल ग्रुप’ने घटनेनंतर लगेच स्पष्ट केले. अतिरेकी हॉटेलमध्ये घुसताच काही क्षणांतच माली सुरक्षा दलाने हॉटेलला घेरले. यानंतर संयुक्त राष्ट्राची ‘मिनुसमा’ शांतता सुरक्षा दल तसेच फ्रान्सच्या ‘गिग्न’शाखेचा सुमारे ४० निमलष्करी पोलिसांचा विशेष सुरक्षा दस्ताही घटनास्थळी दाखल झाला. या सुरक्षा दलांनी संयुक्तपणे धडक कारवाई करीत सर्व ओलिसांची सुरक्षित सुटका केली.
प्रारंभी अतिरेक्यांनी तीन ओलिसांना ठार केल्याचे वृत्त आले. मात्र हॉटेलमध्ये १८ जणांचे मृतदेह आढळून आल्याचे एका वृत्तसंस्थेने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले. या हल्ल्यात तीन सुरक्षारक्षक जखमी झाले असून त्यांच्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अद्याप कुठल्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. एक वरिष्ठ सुरक्षा सूत्र व हॉटेलच्या आॅपरेटरने सांगितले की, बंदुकधाऱ्यांनी हॉटेलला लक्ष्य केले.
हे हॉटेल सरकारी मंत्रालये आणि राजनयिक कार्यालयांनजीक आहे. अनेक तासांच्या सुरक्षा अभियानानंतर रात्री उशिरा ‘रेजिडोर हॉटेल ग्रूप’ने लंडनमधून निवेदन जारी करून अद्यापही आमचे १२५ पाहुणे व १३ कर्मचारी अतिरेक्यांच्या तावडीत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर
काहीच तासांतच सर्व ओलिसांना सुरक्षित बाहेर काढण्यात
आल्याचे मालीच्या सुरक्षा मंत्र्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी आॅगस्टमध्ये मध्य मालीच्या सेवेरे शहरातही अशीच घटना घडली होती. यात सुमारे २४ तास बंदी बनवून ठेवल्यानंतर अतिरेक्यांनी या सर्व बंदींना दुसऱ्या हॉटेलात नेले होते. या घटनेत चार जवान, पाच संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांसह पाच हल्लेखोरांचा मृत्यू झाला होता.
मुंबईसारखा आठवडाभरात दुसरा हल्ला
मुंबई हल्ल्यासारखा आठवडाभरात हा दुसरा अतिरेकी हल्ला आहे. गेल्या शनिवारी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे अशाच अतिरेकी हल्ल्यात १३२ निष्पापांचा बळी गेला होता. २००८ मध्ये मुंबईत दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी दोन हॉटेलांमध्ये केलेल्या नरसंहारात १६४ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
...आणि भारतीयांची सुटका : ‘जिहादीं’नी हॉटेलात बंदी बनवून ठेवलेल्यांमध्ये २० भारतीयांचा समावेश होता. हे भारतीय दुबईच्या एका कंपनीत काम करीत होते. रात्री उशिरा या सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आल्याचे वृत्त भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिले.
कुराणातील ‘आयत’ ऐकवल्यावर सोडले
हल्लेखोरांनी ओलिसांना कुराणातील ‘आयत’ म्हणायला सांगितले. काही ओलिसांनी कुराणातील ‘आयत’ ऐकवल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.
असा केला प्रवेश
सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूकधारी हल्लेखोर ‘जिहादी’ आहेत. डिप्लोमॅटिक प्लेट्स लावलेल्या गाडीतून ते आले. त्यामुळे हॉटेलात त्यांना सहज प्रवेश मिळाला. त्यानंतर अतिरेक्यांनी १९० खोल्यांच्या या हॉटेलच्या सातव्या माळ्यावर अंदाधुंद गोळीबार केला.