सेन्साॅरशिपमुळे ‘एक्स’ने थेट कामकाज थांबविले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 09:05 AM2024-08-19T09:05:43+5:302024-08-19T09:06:50+5:30
माेरेस यांनी कंपन्याच्या वकिलाला अटक करण्याची धमकी दिल्याचा दावा ‘एक्स’ने केला आहे.
न्यूयाॅर्क : साेशल मीडिया ‘एक्स’ने सर्वाेच्च न्यायालयाच्या सेन्साॅरशिपच्या आदेशानंतर ब्राझीलमध्ये कामकाज थांबविले आहे. कंपनीचे सीईओ इलाॅन मस्क यांनी यासंदर्भात माहिती दिली. मात्र, ब्राझीलमधील लाेकांसाठी ‘एक्स’च्या सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.
मस्क यांनी सांगितले की, सर्वाेच्च न्यायालयाचे न्या. एलेक्झेंड्रे डी माॅरेस यांनी अवैधरित्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती देणे तसेच सीक्रेट सेन्सॉरशिपच्या मागणीमुळे आम्ही अखेर ब्राझीलमध्यील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कठीण हाेता. मात्र, लाजिरवाणे न हाेता आमचे कार्य समजाविण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता.
माेरेस यांनी कंपन्याच्या वकिलाला अटक करण्याची धमकी दिल्याचा दावा ‘एक्स’ने केला आहे. कंपनीने म्हटले की, ‘एक्स’वरून काही कंटेंट हटविला नाही, तर प्रतिनिधीला अटक करण्यात येईल. आमच्या अनेक याचिकांवर सुनावणी झालीच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही ब्राझीलमध्ये कंपनीचे कामकाज तत्काळ थांबविले आहे.