भूकंपामुळे उघड्यावर आला संसार...; मृतांचा आकडा २६८ वर, १५१ अद्यापही बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:06 AM2022-11-23T11:06:42+5:302022-11-23T11:08:12+5:30
सियांगजूर शहराजवळ सोमवारी दुपारी झालेल्या ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात १०८३ लोक जखमी झाले असल्याची माहितीही संस्थेने पत्रकारांना दिली.
सियांगजूर (इंडोनेशिया) : इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या मंगळवारी वाढून २६८ झाली आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडत असल्याने मृतांचा आकडा वाढत आहे. दुसरीकडे १५१ लोक अद्यापही बेपत्ता आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेने ही माहिती दिली.
सियांगजूर शहराजवळ सोमवारी दुपारी झालेल्या ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात १०८३ लोक जखमी झाले असल्याची माहितीही संस्थेने पत्रकारांना दिली. यापैकी ३००हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. भूकंपामुळे ग्रामीण भागातील इमारतींचीही पडझड झाली. भूकंपाचा धक्का जाणवताच मी कुटुंबासह घराबाहेर पडले व काही वेळातच घर कोसळले. मी पती आणि मुलांना घराबाहेर काढले नसते तर आम्हा सर्वांना प्राण गमवावे लागले असते, असे पेर्टिनेम नावाच्या एका महिलेने सांगितले.
भूकंपामुळे सिजेडिल गावात रस्त्यावर दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली तसेच अनेक घरे कोसळली, असे राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख हेन्री अल्फियांडी यांनी सांगितले.