अनैसर्गिक कृत्यप्रकरणी विरोधी नेत्याचे दोषत्व मलेशियात कायम
By admin | Published: February 10, 2015 10:49 PM2015-02-10T22:49:11+5:302015-02-10T22:49:11+5:30
मलेशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने राजकीय कार्यकर्त्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या २००८ च्या प्रकरणामध्ये विरोधी नेते अन्वर इब्राहीम
क्वालालंपूर : मलेशियाच्या सर्वोच्च न्यायालयाने राजकीय कार्यकर्त्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या २००८ च्या प्रकरणामध्ये विरोधी नेते अन्वर इब्राहीम यांना दोषी ठरवून त्यांची पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा मंगळवारी कायम ठेवली. या निकालाने माजी उपपंतप्रधानांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला आहे.
सरन्यायाधीश अरफीन जकारिया यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठाने ६७ वर्षीय अन्वर यांना दोषी ठरवत हा निकाल दिला. सहा मुलांचे वडील आणि पाच मुलांचे आजोबा असलेल्या अन्वर यांनी मोहंमद सैफुल या राजकीय कार्यकर्त्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याचे ठोस पुरावे असल्याचे न्यायालयाने सांगितले.
आरोप सिद्ध झाले आहेत. याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे आम्ही कोर्ट आॅफ अपीलच्या निकालाशी सहमत आहोत, असे सरन्यायाधीशांना अन्वर यांचे अंतिम अपील फेटाळताना सांगितले. अन्वर न्यायालयात शांत होते. त्यांनी कुटुंबीय आणि समर्थकांची गळाभेट घेतली. त्यांच्या मुलींसह काहींचे डोळे पाणावले होते.
९ जानेवारी २०१२ रोजी क्वालालंपूर उच्च न्यायालयाने अन्वर यांची सैफुल याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या आरोपातून सुटका केली होती. मात्र, त्यानंतर कोर्ट आॅफ अपीलने उच्च न्यायालयाचा हा निकाल फेटाळताना गेल्यावर्षी अन्वर यांना पाच वर्षांचा कारावास सुनावला होता. त्याविरुद्ध अन्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
समलैंगिकतेचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून त्यामुळे इब्राहीम यांची कारकीर्द संपुष्टात येईल, असे त्यांच्या समर्थकांना वाटते.(वृत्तसंस्था)