Priyanka Sohoni: UN परिषदेत माईक बंद पडला, तरीही न थांबता चीनला खडेबोल सुनावले; कोण आहे प्रियंका सोहनी? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 01:16 PM2021-10-21T13:16:17+5:302021-10-21T13:18:34+5:30
Who is Priyanka Sohni: यूएन परिषदेत बोलताना भारताच्या प्रथम सचिव प्रियंका सोहनी यांचा माइक मध्येच बंद पडला, पण त्यांनी न थांबता चीनवर सडेतोड हल्लाबोल केला.
भारतानं संयुक्त राष्ट्र परिषदेत चीनच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह' (BRI) आणि त्यासंदर्भातील महत्त्वाकांक्षी योजनांचा कडाडून विरोध केला. भारताकडून सचिव प्रियंका सोहनी यांनी चीनला खडेबोल सुनावले. एक वेळ अशीही आली की सोहनी बोलत असताना त्यांचा माइक बंद पडला होता. पण त्यांनी पुन्हा आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली आणि चीनला CPEC संदर्भात गैरकारभाराचा आरसाच दाखवला. सोहनी यांचं भाषण झाल्यानंतर चीनी परिवहन मंत्री ली शियोपिंग यांनी माइक बंद झाल्याच्या घटनेबाबत सोहनी यांची माफी देखील मागितली.
अचानक माइक बंद आणि सुरू झाला दुसऱ्याच वक्त्याच्या व्हिडिओ
१४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत चीनच्या अध्यक्षतेखाली आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अचानक माइक बंद झाल्यानं संभ्रम निर्माण झाला होता. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी काही मिनिटांचा अवधी लागला. गडबड इतकी झाली की सोहनींचा माइक बंद तर झालाच. पण मध्येच पुढच्या वक्त्याचा एक व्हिडिओ स्क्रिनवर सुरू झाला. पण संयुक्त राष्ट्राचे महासचिव लियू झेनमिन यांनी वेळीच तो थांबवला.
झेनमिन यांनी पुढाकार घेत भारतीय दूतावासाच्या सचिव प्रियंका सोहनी यांना आपलं भाषण सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सर्व सेवा सुरळीत सुरू झाल्यावर झेनमिन यांनी सर्वांची माफी देखील मागितली.
चीनला आरसा दाखवला
प्रियंका सोहनी यांनी कोणतीही तक्रार न करता पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि थेट मुद्द्याला हात घातला. "आपल्याला भौतिक संपर्क वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायांकडून खूप अपेक्षा आहेत. सर्वांना समान आणि संतुलित पद्धतीनं व्यापक स्वरुपात आर्थिक लाभ व्हावा असं आमचं म्हणणं आहे. संमेलनात बीआरआयचा उल्लेख केला गेला. मला इथं विशेष उल्लेख करावा वाटतो की जिथं चीनच्या बीआरआय योजनेमुळे भारतावर खूप मोठा परिणाम झाला आहे. तथाकथित चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोअरमध्ये त्याचा समावेश होणं हे भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्यासारखं आहे", असं स्पष्ट शब्दांत सोहनी यांनी आपलं मत व्यक्त केलं.
कोण आहेत प्रियंका सोहनी?
प्रियंका सोहनी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. चीनमधील भारतीय दूतावासाच्या त्या प्रथम सचिव आहेत. त्यांच्या ट्विटर हँडलवरील माहितीनुसार त्यांना वाचन, इतिहास, कला, निसर्ग, तंत्रज्ञान आणि कायदे विषयात आवड आहे.