अमेरिकेतही पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरा होणार दसरा; १०० शहरांत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 06:11 AM2022-10-03T06:11:45+5:302022-10-03T06:13:01+5:30
रामलीला कार्यक्रमाची पूर्वतयारी दसऱ्याच्या आधी आठ महिन्यांपासून केली जाते.
वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच शंभरहून अधिक शहरांत दसरा सण धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्या देशातील ४० शहरांमध्ये ऑक्टोबर हा हिंदू वारसा महिना म्हणून जाहीर केला आहे. हिंदूंच्या सणांनिमित्त आयोजिल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी अमेरिकेच्या विविध राज्यांनी निधीही उपलब्ध करून दिला आहे.
अमेरिकेत प्रत्येक मोठ्या शहरात रामलीलेचे आयोजन करण्यात येते. त्यात रावणाच्या पुतळ्याच्या दहनाचा कार्यक्रम होतो. पूर्वी रावणाचे पुतळे भारतातून अमेरिकेत पाठविले जायचे. आता अमेरिकेतच रावणाचे पुतळे बनविण्यात येतात. यंदाच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नवरात्रोत्सव, दसरा, दुर्गापूजा, दिवाळी असे सर्व महत्त्वाचे सण आले आहेत. अमेरिकेत राहणाऱ्या हिंदूंचे त्या देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. ते लक्षात घेऊन अमेरिकेतील विविध राज्यांनी ऑक्टोबर हा हिंदू वारसा महिना म्हणून जाहीर केला आहे. (वृत्तसंस्था)
मुलांना ओळख करून देणार रामायणाची
इंडो-एशियन फेस्टिव्हल ग्रुपच्या एका सदस्याने सांगितले की, अमेरिकेतच नव्हे तर ज्या ज्या देशांत भारतीयवंशीयांची लक्षणीय संख्या आहे, तिथे भारतीय सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अमेरिकेत जन्माला आलेल्या आमच्या मुलांना भगवान राम, सीता यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. या सणांच्या निमित्ताने भारतीय दैवतांविषयी आम्ही त्यांना सर्व माहिती देतो, असे आयएएफजीच्या एका सदस्याने सांगितले.
सरकारकडून हिंदू सणांसाठी निधी
- अमेरिकेतील विविध राज्यांत हिंदू सणांनिमित्त आयोजिण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी तेथील सरकारे, विविध कंपन्या निधी उपलब्ध करून देतात.
- न्यूजर्सी येथे होणाऱ्या कार्यक्रमांसाठी तेथील सांस्कृतिक खात्याने तसेच खासगी कंपन्यांनी निधी दिला आहे. टेक्सास, ओहियो, पेनसिल्व्हेनिया आदी ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा दसऱ्याचे कार्यक्रम आयोजिले जाणार आहेत.
आठ महिने आधीपासून पूर्वतयारी
अमेरिकेत दसऱ्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांसाठी कृष्णा सिंघल यांनी यंदा रावणाचे सहा पुतळे बनविले आहेत. त्या देशात होणाऱ्या रामलीला कार्यक्रमाची पूर्वतयारी दसऱ्याच्या आधी आठ महिन्यांपासून केली जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"