सौरमालेबाहेर ‘पृथ्वी’!
By admin | Published: August 26, 2016 06:54 AM2016-08-26T06:54:31+5:302016-08-26T06:54:38+5:30
शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारखा जीवसृष्टीला पोषक वातावरण असलेला ग्रह शोधला आहे.
लंडन : शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारखा जीवसृष्टीला पोषक वातावरण असलेला ग्रह शोधला आहे. या ग्रहाचे तापमान त्याच्या पृष्ठभागावर पाणी द्रव स्वरूपात अस्तित्वात राहू शकेल, एवढेच आहे. त्यामुळे आपल्या सौरमालिकेच्या बाहेर या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे.
खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाला या ग्रहाचे पुरावे मिळाले आहेत. हा ग्रह प्रॉक्सिमा सेंताउरी ताऱ्याला प्रदक्षिणा घालतो. तो डोळ्यांनी दिसत नसला, तरी आपल्यापासून केवळ ४.२ प्रकाश वर्षे (जवळपास २५ खर्व मैल) अंतरावर आहे. हा ग्रह आमच्या सूर्याच्या सर्वात जवळील ताऱ्याला प्रदक्षिणा घालत आहे. त्यामुळे जीवनासाठी पोषक वातावरण आपल्याजवळच उपलब्ध असल्याचे संकेत आहेत.
या ग्रहाला ‘प्रॉक्सिमा बी’ असे नाव देण्यात आले असून, तो ११ दिवसांत आपली प्रदक्षिण पूर्ण करतो. हा ग्रह आमच्या पृथ्वीहून थोडा मोठा आहे. तो गुरूसारखा वायूचा गोळा नाही, तर पृथ्वीसारखा खडकाळ आहे. तो त्याच्या ताऱ्यापासून एवढ्या अंतरावर आहे की, त्याच्या पृष्ठभागावर पाणी द्रव स्वरूपात अस्तित्वात राहू शकते. त्यामुळे या ग्रहावर वातावरण असण्याची शक्यता आहे. हे संशोधन नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. (वृत्तसंस्था)
>आकार मोठा
जीवसृष्टीला पोषक क्षेत्रात या पूर्वीही ग्रह आढळले आहेत. त्यांचा सर्वांचा आकार पृथ्वीहून ४० टक्क्यांनी अधिक असून, त्यांची रचना समजून घेणे आव्हानच आहे. तथापि, प्रॉक्सिमा बी हा ग्रह पृथ्वीची प्रतिकृती असल्यासारखा आहे. या ग्रहाचा शोध म्हणजे पृथ्वीसारख्या जगताचा शोध लावण्याच्या दिशेने पडलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
‘प्रॉक्सिमा बी’वर जीवसृष्टी आहे का,
हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना या ग्रहाचे छायाचित्र घ्यावे लागणार आहे.
हा ग्रह एवढा जवळ आहे की, एक दिवस यंत्रमानवही त्यावर पोहोचू शकेल. तथापि, येत्या काही शतकांपर्यंत दुसऱ्या सौरमालिकेतील ग्रहांची अंतराळ मोहीम हाती घेण्याएवढे तंत्रज्ञान विकसित
होऊ शकणार नाही.