हवामान बदलामुळे पृथ्वी झाली डळमळीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 05:05 PM2018-09-27T17:05:41+5:302018-09-27T17:05:59+5:30

विसाव्या शतकामध्ये पृथ्वीवरील विविध घटनांमुळे, औद्योगिकरणामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत गेले आणि त्यामुळे ग्रीनलँडवरील बर्फ वितळले. या कालावधीमध्ये ७५०० गिगाटन म्हणजे अमेरिकेतील एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराइतक्या २ कोटी इमारती एकत्र केल्यास जेवढा आकार होईल तितका बर्फ वितळला आहे.

Earth wobbles due to climate change? | हवामान बदलामुळे पृथ्वी झाली डळमळीत?

हवामान बदलामुळे पृथ्वी झाली डळमळीत?

googlenewsNext

न्यू यॉर्क- पृथ्वी ही आपल्या आसाभोवती फिरत असते. पृथ्वीचा आस म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला जोडणारी काल्पनिक रेषा. गेल्या शतकभरामध्ये पृथ्वीचा आस ४ इंचांनी हलला आहे आणि ग्रीनलँडमधील हिमखंड मोठ्या प्रमाणात वितळले आहेत. या दोन्ही कारणांमुळे पृथ्वी डळमळीत झाल्याचे अमेरिकन संशोधन संस्था नासाने म्हटले आहे. 

    विसाव्या शतकामध्ये पृथ्वीवरील विविध घटनांमुळे, औद्योगिकरणामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत गेले आणि त्यामुळे ग्रीनलँडवरील बर्फ वितळले. या कालावधीमध्ये ७५०० गिगाटन म्हणजे अमेरिकेतील एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराइतक्या २ कोटी इमारती एकत्र केल्यास जेवढा आकार होईल तितका बर्फ वितळला आहे. समुद्राची पातळी वाढण्यामध्ये ग्रीनलँडचा मोठा वाटा आहे. त्यामुळे समुद्रजलात वाढ झाली आणि पृथ्वीचा आस ढळण्यास मदत झाली असे नासाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. याचाच अर्थ मनुष्यामुळे वातावरण बदल आणि पर्यायाने समुद्रपातळीत वाढ झाली व शेवटी पृथ्वीच डळमळीत झाली असा निष्कर्ष काढता येतो.

तज्ज्ञांच्या मते ग्रीनलँड आणि अंटार्क्टीका येथिल बर्फ वितळण्याचा पृथ्वीच्या आासावर अधिक परिणाम झाला आहे. ध्रुवापासून ४५ अंशावर असणारे हिमखंड वितळल्यास (उत्तरेस ग्रीनलँड आणि दक्षिणेस पॅटागोनिया ग्लेशियर्स) पृथ्वीच्या आसावर अधिक परिणाम होतो मात्र ध्रुवाजवळील बर्फ वितळल्यास तितका परिणाम होत नाही, असे या शोधनिबंधाचे सहलेखक एरिक इविन्स यांनी सांगितले.
ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्या वितळणे किंवा त्यांचे आकारमान कमी होण्याचाही पृथ्वीच्या डळमळीत होण्यावर परिणाम होतो असे हे संशोधक म्हणतात मात्र हिमनद्या वितळणे हे मुख्य कारण नाही असेही त्यांनी नमूद केले आहे. शेवटच्या हिमयुगामध्ये वजनदार हिमनद्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठा दाब दिला. आपण गादीवर अंग टेकल्यावर वजनामुळे कशी ती खाली जाते आणि पसरते त्याचप्रमाणे हिमनद्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब दिला होता. त्यांचे वजन कमी झाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा आपल्या मूळ जागेवर येतो. त्यामुळेही पृथ्वी दोलायमान होते. 

पृथ्वीवरील भूखंडवहनामुळेही ती दोलायमान होते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भूखंड हे पृथ्वीच्या गाभ्यातील उष्णतेमुळे सरकत असतात. आपण एखाद्या पातळ पदार्थाचे भांडे उकळायला ठेवल्यावर त्यात उष्णतेच्या स्रोतापासून उर्ध्वगामी हालचाल सुरु होते. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या गाभ्यातील उष्णतेमुळे भूखंडांचे वहन असते. 
पृथ्वीच्या परिवलनामध्ये फरक पडल्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात काय फरक पडेल यावर  या संशोधकांनी फारसा फरक पडणार नाही असे उत्तर दिले. मात्र जीपीएसच्या अचूकतेत आणि उपग्रहांच्या कार्यावर थोडा परिणाम होईल असे नासाचे संशोधक म्हणतात.
 

Web Title: Earth wobbles due to climate change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.