भूकंपाचा पुन्हा हादरा!
By admin | Published: May 13, 2015 02:21 AM2015-05-13T02:21:36+5:302015-05-13T02:21:36+5:30
आठ हजारांहून बळी घेणाऱ्या व लाखोंचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने अद्यापही न सावरलेल्या नेपाळमध्ये मंगळवारी दुपारी पुन्हा मोठा भूकंप झाला
काठमांडू/ नवी दिल्ली : आठ हजारांहून बळी घेणाऱ्या व लाखोंचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने अद्यापही न सावरलेल्या नेपाळमध्ये मंगळवारी दुपारी पुन्हा मोठा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर ७.३ तीव्रतेची नोंद झालेल्या या भूकंपाचे जोरदार धक्के भारताच्या पूर्व आणि उत्तरेकडील राज्यांना बसले. या ताज्या भूकंपामुळे नेपाळमध्ये ४२ जण ठार तर १ हजाराहून लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतात या भूकंपाचा सर्वाधिक तडाखा बिहारला बसला व त्याने १७ जणांचा बळी घेतला. या नव्या भूकंपामुळे नेपाळप्रमाणेच भारतात पूर्वेला आसाम, पश्चिमेला गुजरात व दक्षिणेला चेन्नईपर्यंतच्या पट्ट्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले.
दुपारी १२.३५ वाजता आलेल्या मुख्य भूकंपानंतर नेपाळमध्ये भूकंपाचे आणखी सात धक्के जाणवले. त्याने काठमांडूच्या उत्तरेस असलेल्या सिंधुपालचौक व ढोलाका या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्राणहानी झाली व मागच्या भूकंपात वाचलेली घरे व इमारतीही जमीनदोस्त झाल्या, असे दिल्लीतील नेपाळी दूतावासाने म्हटले आहे. पूर्व व उत्तर भारतालाही भूकंपाचे धक्के बसले. त्यानंतर ६.२, ५.४ आणि ४.८ तीव्रतेचे तीन भूकंपपश्चात धक्के बसले. नेपाळमधील या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि चेन्नईतही जाणवले, पण या ठिकाणी कोणतीही वित्त वा जीवितहानी झाली नाही. याआधी २५ एप्रिलला आलेल्या भूकंपातही बिहारमध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते. (वृत्तसंस्था)