भूकंपामुळे पाच देशांत आक्रोश, आरोळ्या! लोक ओरडत जिवाच्या आकांताने पडले घराबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:06 IST2025-03-29T16:05:44+5:302025-03-29T16:06:29+5:30
इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या

भूकंपामुळे पाच देशांत आक्रोश, आरोळ्या! लोक ओरडत जिवाच्या आकांताने पडले घराबाहेर
बँकॉक : म्यानमारमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या ७.७ रिक्टर स्केलच्या भूकंपाच्या जोरदार धक्क्याने म्यानमार, थायलंडशिवाय भारत, बांगलादेश आणि चीन हादरला. ५ देशांतील विविध भागातील शेकडो लोक भीतीने घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले.
शक्तिशाली भूकंपाने मंडाले परिसरातील ९० वर्षे जुना पूल कोसळला व म्यानमारच्या सर्वांत मोठ्या शहराला रंगून शहराशी जोडणारे महामार्गही क्षतिग्रस्त झाले. जे लोक भूकंपाला पहिल्यांदाच सामोरे गेले, त्यांना हे काय घडत आहे, हे न कळाल्यामुळे अनेकांना अक्षरश: चक्कर आली.
सिटी सेंटरमध्ये काम करणारी एप्रिल कनिचवानाकुलने सांगितले की, हा भूकंप आहे, हे मला आधी कळालेच नाही. मला चक्कर आली. टोनसन टॉवरच्या दहाव्या मजल्यावरून ती व तिची सहकर्मी खाली उतरल्या व बाहेर पडल्या. कॅमेरा घेण्यासाठी गेलेला स्कॉटलँडचा पर् यटक फ्रेजर मॉर्टनने सांगितले की, अचानक संपूर्ण इमारत हलू लागली व आरडाओरडा, आक्रोश, आरोळ्यांनी परिसर दणाणून गेला. गडबड सुरू झाल्यावर घबराट पसरली व लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले. मॉलमध्येही मोठ-मोठे आवाज येऊ लागले व वस्तू फुटल्याचे दिसू लागले. (वृत्तसंस्था)
उभे राहणेही अवघड झाले
म्यानमारची राजधानी नेपितामध्ये भूकंपाने काही धार्मिक स्थळांचे नुकसान झाले. त्यांचा काही भाग कोसळला. चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या युनान व सिचुआन प्रांतातही भूकंपाचे धक्के बसले. रुइली शहरात अनेक घरांचे नुकसान झाले. रुईलीपासून १०० किलोमीटर अंतरावर चिनी शहर मंगशीमध्ये भूकंप एवढा शक्तिशाली होता की लोकांना उभे राहणेही अवघड झाले होते.
भूकंपामुळे म्यानमारसह अनेक भागांत प्रचंड नुकसान झाले. पॅगोडा, अनेक मंदिरे, इमारती कोसळून जमीनदोस्त झाल्या. अनेक रस्ते इतके खचले आहेत की त्यामध्ये उभ्या मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. मंडालेमध्ये राजवाडा व इमारतींचे नुकसान झाले आहे.