Taiwan Earthquake : तैवानमध्ये जोरदार भूकंपाचा धक्का, 7.2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता, त्सुनामीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 07:40 AM2024-04-03T07:40:42+5:302024-04-03T07:41:58+5:30
Taiwan Earthquake : बुधवारी पहाटे तैवानची राजधानी तैपेईमध्ये हा भूकंप झाला.
तैवानची राजधानी तैपेईमध्ये बुधवारी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजण्यात आली. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
तैवान सरकारने जारी केलेल्या अपडेटनुसार, बुधवारी पहाटे तैवानची राजधानी तैपेईमध्ये हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या हुआलियन शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येते. या भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
समुद्रात 3 मीटर (9.8 फूट) उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जपानमध्ये त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे. लोकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. देशभरातील बचावकार्य पथकांना सतर्क करण्यात आले आहे.
#WATCH | An earthquake with a magnitude of 7.2 hit Taipei, the capital of Taiwan.
— ANI (@ANI) April 3, 2024
Visuals from Beibin Street, Hualien City, Hualien County, eastern Taiwan.
(Source: Focus Taiwan) pic.twitter.com/G8CaqLIgXf
सोशल मीडियातून समोर आलेल्या व्हिडीओनुसार, या भूकंपानंकर अनेक इमारती कोसळल्या आहेत. पूल आणि रस्त्यांवरील वाहने हालताना दिसले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे दिसून येत आहे.
भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
तैवानमधील भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानचे म्हणणे आहे की, ओकिनावा प्रांताच्या आसपासच्या किनारी भागासाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या त्सुनामी लाटा तीन मीटरपर्यंत उंच असू शकतात.
7.5 magnitude earthquake in Taiwan #earthquake
— Tales (@nigertale) April 3, 2024
The shaking was so bad that people had to stop pic.twitter.com/Y90usIHUlt
फिलीपिन्समध्येही सतर्कतेचा इशारा
त्सुनामीची शक्यता लक्षात घेऊन फिलीपिन्समध्येही सतर्कतेचा इशारा दिला आहे. फिलीपिन्सच्या भूकंप विज्ञान संस्थेने अनेक प्रांतांच्या किनारी भागासाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. येथे राहणाऱ्या लोकांना उंच भागात जाण्यास सांगितले आहे.
भूकंप का येतात?
पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि त्यानंतर भूकंप होतो.