ताजिकिस्तानात २४ तासांत दोनदा जमीन हादरली; ६.१ रिश्टर स्केलच्या धक्क्यानं लोक घाबरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 11:52 IST2025-04-13T11:52:10+5:302025-04-13T11:52:52+5:30
ताजिकिस्तान आणि पाकिस्तान जोरात भूकंपाचे धक्के बसले तर टोंगा, पपुआ न्यू गिनी येथे ६.० रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

ताजिकिस्तानात २४ तासांत दोनदा जमीन हादरली; ६.१ रिश्टर स्केलच्या धक्क्यानं लोक घाबरले
ताजिकिस्तानमध्ये रविवारी एका तासांत दोन भीषण भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामुळे इथल्या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. पहिला धक्का ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता जो खूप धोकादायक होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे लोक त्यांच्या घरातून बाहेर पडले. अद्याप यात कुठल्याही मोठ्या दुर्घटनेचे आणि जीवितहानीची माहिती नाही. भूकंपाचं केंद्र बिंदू ताजिकिस्तानच्या डोंगराळ भागात असल्याचं सांगण्यात येत आहे.
अलीकडच्या काळात वारंवार येणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक चिंतेत आहेत. ताजिकिस्तानमध्ये शनिवारी दुपारी साडे बारा वाजताही भूकंप आला होता. त्याची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. मागील दिवसांत भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान, ताजिकिस्तानच्या सीमेवर होते. २४ तासांत दुसऱ्यांदा ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी दुपारी भारतासह शेजारील राष्ट्रातही भूकंपाचे धक्के जाणवले. काश्मीरशिवाय पाकिस्तान, ताजिकिस्तान, टोंगा, पपुआ न्यू गिनी याभागात भूकंपाचे धक्के बसले.
या भूकंपाची तीव्रता ४.० ते ६.० रिश्टर स्केल इतकी होती. ताजिकिस्तान आणि पाकिस्तान जोरात भूकंपाचे धक्के बसले तर टोंगा, पपुआ न्यू गिनी येथे ६.० रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. पाकिस्तानात शनिवारी दुपारी ५.८ रिश्टर स्केल भूकंप आला होता. या भूकंपाचे केंद्र बिंदू राजधानी इस्लामाबादच्या रावलपिंडीत होते.इस्लामाबाद,अटक,चकवाल आणि पंजाबच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.
पृथ्वीच्या आत ७ प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत राहतात. या प्लेट जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा धरणी कंप पावू लागते. वारंवार होणाऱ्या टक्करमुळे या प्लेट्सचे कोण वाकू लागतात. यामुळे दबाव निर्माण होतो, त्याखालील ऊर्जा बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. या दबावातून भुकंपाचे हादरे बसू लागतात.