Earthquake in Turkey: भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये ऑस्ट्रियाने अचानक मदतकार्य थांबविले; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 06:33 PM2023-02-11T18:33:28+5:302023-02-11T18:33:41+5:30
भारतीय लष्कराने तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आपले लष्करी रुग्णालय देखील उघडले आहे. मृतांचा आकडा 24 हजारांच्या पुढे गेला आहे.
तुर्की आणि सिरीयामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत २४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील देशांनी याठिकाणी आपापले सैन्य पाठवून बचावकार्याला सुरुवात केली आहे. या देशांमध्ये ऑस्ट्रियाच्या सैन्याचा देखील सहभाग आहे. परंतू, अचानक ऑस्ट्रियाने हे बचावकार्य थांबविल्याने खळबळ उडाली आहे.
सुरक्षेचा हवाला देत ऑस्ट्रियाने तुर्कीतील बचावकार्य थांबविले आहे. भूकंपबाधित क्षेत्रात ऑस्ट्रियाचे सैनिक नागरिकांना मदत करत होते. यावेळी काही ठिकाणी स्थानिक नागरिकांसोबत संघर्ष झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे ऑस्ट्रियाने आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी मिशन सस्पेंड करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
सध्या तरी ऑस्ट्रियाच्या सैन्याला बेस कॅम्पमध्ये थांबण्यास सांगितले गेले आहे. इतर काही संस्थांसोबत टीम तेथे थांबलेली आहे. सध्या त्यांच्याकडून बचाव मोहीम राबवली जात नाही. मधेच मिशन स्थगित करण्यात आले आहे. उघडपणे काहीही बोलण्यास टाळले जात आहे. अनेक देशांचे सैन्य तुर्कस्तान आणि सीरियामध्ये मदतीसाठी पोहोचले आहे. भारताकडून एनडीआरएफची टीमही मैदानावर हजर आहे. मदत साहित्यही पोहोचवण्यात आले आहे, असे असताना अचानक ऑस्ट्रियाने मदतकार्य थांबविल्याने खळबळ उडाली आहे.
भारतीय लष्कराने तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आपले लष्करी रुग्णालय देखील उघडले आहे. मृतांचा आकडा 24 हजारांच्या पुढे गेला आहे. तो आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते भूकंपामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते. सध्या हजारो लोक भूकंपग्रस्त भागात रुग्णालयात दाखल आहेत. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारीला सकाळी भूकंप झाला होता. आजही लोक जिवंत सापडत आहेत.