उद्ध्वस्त...! तुर्की, सीरिया भूकंपातील मृत्यूंचा आकडा ४ हजारावर, ५६०० इमारती कोसळल्या; भारतानं पाठवली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 08:36 AM2023-02-07T08:36:49+5:302023-02-07T08:39:19+5:30
तुर्कीत १०० वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या भूकंपानं सारंकाही उद्ध्वस्त झालं आहे. ज्यानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे.
तुर्कीत १०० वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या भूकंपानं सारंकाही उद्ध्वस्त झालं आहे. ज्यानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. काल पहाटे जेव्हा संपूर्ण देश साखरझोपेत होता. तेव्हा तुर्की आणि सीरिया हादरली. उंचच उंच इमारती पत्त्यासारख्या एका क्षणात कोसळल्या. वर्दळीच्या शहरांचं रुपांतर आज खंडरमध्ये झालंय. दोन्ही देशांमधील मृत्यूंचा आकडा आता वाढतच चालला आहे. आतापर्यंत ४ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यात तुर्कीतील २८०० तर सीरियामध्ये १२०० हून अधिक जणांचा समावेश आहे.
तुर्की आणि सीरियातील या कठीण प्रसंगी अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतानं मदतीचा हात पुढे करत मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. मदत आणि बचावासाठी गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरुन एनडीआरएफच्या टीम तुर्कीसाठी रवाना झाल्या आहेत.
In #Sanliurfa the moment a building collapsed recorded by mobile phone hours after 7.8 #earthquake hits Turkey. #deprempic.twitter.com/YDc8DH9lbn
— JournoTurk (@journoturk) February 6, 2023
तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भूकंपामुळे झालेल्या विनाशाचे वर्णन शतकातील सर्वात मोठी आपत्ती असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दरम्यान ध्वज अर्ध्यावर आला आहे. आपत्तीच्या या कठीण काळात तुर्कस्तानला आपल्या जुन्या शत्रू देशांचाही पाठिंबा मिळत आहे. वर्षानुवर्षे सीमा विवाद असूनही ग्रीसने तुर्कस्तानला मदतीचे आश्वासन दिले आहे. याशिवाय नाटो, इस्लामिक सहकार्य संघटनेनेही तुर्कस्तानप्रती सहानुभूती व्यक्त करताना मदत देऊ केली आहे.
Total Chaos as buildings collapse while Live on TV during the 2nd Earthquake. pic.twitter.com/pRge7JYgZM
— OSINTdefender (@sentdefender) February 6, 2023
तुर्कीतील भूकंपामुळे उंच इमारती एका क्षणात कोसळल्या. भूकंपानंतर अवघ्या ५ सेकंदात सॅनलुर्फा शहराची बहुमजली इमारत पूर्णपणे कोसळली. बहुमजली इमारतीचा ढिगारा ट्रान्सफॉर्मरवर पडला, त्यामुळे विजेचे खांब जमिनीवर कोसळले आणि जिवंत तारा रस्त्यावर विखुरल्या. तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे सर्वात जास्त विध्वंस दियारबाकीर शहरात झाल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंप इतका जोरदार होता की भक्कम इमारतीही वाळूच्या ढिगाऱ्यांसारख्या विखुरल्या आहेत.
दशकातील सर्वात भीषण भूकंप
गेल्या काही दशकांतील भूकंपांपैकी हा भूकंप सर्वात भीषण आहे. ३ हजाराहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तुर्कीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत २८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १२ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले असले तरी त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.