पाकिस्तान-अफगाणिस्तानात भूकंप
By admin | Published: January 9, 2016 03:35 AM2016-01-09T03:35:25+5:302016-01-09T03:35:25+5:30
पाकिस्तानात राजधानी इस्लामाबादसह अनेक भागांना शुक्रवारी ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. तथापि, तूर्तास जीवितहानीचे वृत्त नाही.
इस्लामाबाद : पाकिस्तानात राजधानी इस्लामाबादसह अनेक भागांना शुक्रवारी ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. तथापि, तूर्तास जीवितहानीचे वृत्त नाही.
या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान आणि तजिकिस्तानच्या सीमावर्ती भागात होता, असे पाकिस्तानच्या हवामान विभागाने सांगितले. यावर्षी देशाच्या उत्तर भागामध्ये झालेला हा तिसरा भूकंप आहे. खैबर पख्तूनख्वाच्या पेशावर, मलकंद, हरीपूर, मानेशहरा, स्वात, दीर व अबोटाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. हे भाग आॅक्टोबरमधील विध्वंसक भूकंपाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. गेल्या वर्षी झालेल्या ७.५ तीव्रतेच्या या भूकंपात ३०० लोकांचा बळी गेला होता. आजच्या भूकंपाची शांगला, चित्राल, स्वात आणि डार क्षेत्रात अधिक तीव्रता होती. धक्क्यानंतर लोक घाबरून रस्त्यावर आले. तथापि, तूर्तास कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. अमेरिकन भूगर्भशास्त्र विभागानुसार, या भूकंपाची तीव्रता पाच होती व त्याचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या जर्म भागात होता. दरम्यान या भूकंपाचे जम्मू-काश्मीरसह भारताच्या उत्तर भागातही हादरे जाणवले. मात्र कोणत्याही हानीचे वृत्त नाही. (वृत्तसंस्था)