भूकंपाने चीन हादरला! गान्सू प्रांतात इमारती कोसळल्या, ८६ लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 05:42 AM2023-12-19T05:42:17+5:302023-12-19T05:42:37+5:30
काउंटी, डियाओझी आणि किंघाई प्रांतात भूकंपामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठा भूकंप झाला आहे. यामुळे चीनचा गान्सू प्रांत हादरला असून यामध्ये आतापर्यंत ८६ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे चारच्या सुमारास अंदमानच्या समुद्रात देखील कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नुसार, सोमवारी रात्री 23:59 वाजता उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात जोरदार भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक इमारती कोसळल्या आहेत, असे प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे.
काउंटी, डियाओझी आणि किंघाई प्रांतात भूकंपामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानात ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मात्र, यात कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.