भूकंप, त्सुनामीने जागतिक तापमानवाढ
By admin | Published: March 27, 2015 11:59 PM2015-03-27T23:59:01+5:302015-03-27T23:59:01+5:30
२०११ साली जपान उद्ध्वस्त करणारा भूकंप व त्सुनामीने जागतिक तापमानात वाढ झाली असून, पृथ्वीभोवती कवच असणाऱ्या ओझोनच्या थराचेही नुकसान झाले .
वॉशिंग्टन : २०११ साली जपान उद्ध्वस्त करणारा भूकंप व त्सुनामीने जागतिक तापमानात वाढ झाली असून, पृथ्वीभोवती कवच असणाऱ्या ओझोनच्या थराचेही नुकसान झाले . चार वर्षांपूर्वी जपानला बसलेल्या ९ रिक्टर तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यात हजारो इमारती नष्ट झाल्या वा त्यांचे नुकसान झाले.
या प्रक्रियेत इमारतीत साठवला गेलेला ६६०० मे. टन गॅस बाहेर पडला व वातावरणात सोडला गेला. या गॅसमधील हालोकार्बन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायनांचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढले व ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचले. भूकंपामुळे वातावरणात सोडलेल्या या रसायनासह हालोकार्बनमुळे ओझोनच्या थराचे नुकसान झाले. त्यामुळे पृथ्वीचे तापमान अधिक वाढले. यापैकी काही गॅस पर्यावरणाला घातक असल्याने सध्या वापरले जात नाहीत. यातच क्लोरोफ्लुरोकार्बन म्हणून ओळखला जाणारा सीएफसी ११ हा वायू फेस तयार करण्यासाठी वापरला जातो; पण त्यामुळे ओझोनचे नुकसान होते. १९९६ नंतर त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. तसेच यावेळी सोडलेल्या गॅसमध्ये हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बनही असून एचसीएफसी -२२ हा त्याचाच एक प्रकार आहे. हा एक शक्तिशाली गॅस असून, त्याचाही वापर बंद आहे. एचएफसी वा सल्फर हेक्झाफ्लुराईड हे वायू तापमानवाढीस कारणीभूत आहेत. भूकंपानंतर वातावरणात सोडल्या गेलेल्या गॅसमध्ये एचसीएफसी -२२ या वायूचे प्रमाण ५० टक्के होते. भूकंपाआधी वातावरणात मिसळल्या जाणाऱ्या गॅसच्या तुलनेत ते ३८ टक्के जास्त होते. (वृत्तसंस्था)
नुकसानीचा अंदाज काढला पाहिजे...
नैसर्गिक आपत्तीनंतर वातावरणात सोडल्या जाणाऱ्या वायूंचे प्रमाण ठरवून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज काढला गेला पाहिजे, असे रसायन तज्ज्ञ स्टीव्ह मोंटात्झका यांनी म्हटले आहे.