पृथ्वीची गती मंदावली? 2018मध्ये मोठे भूकंप होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 06:09 PM2017-11-20T18:09:27+5:302017-11-20T18:24:42+5:30
पृथ्वीची परिवलनाची गती मंदावल्यामुळे 2018 साली मोठे भूकंप होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
न्यू यॉर्क- पृथ्वीची परिवलनाची गती मंदावल्यामुळे 2018 साली मोठे भूकंप होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
पृथ्वीच्या परिवलनाची गती वैज्ञानिक अत्यंत अचूकरित्या मोजतात. सन 1900 पासून वैज्ञानिकांनी 7.0 रिश्टर स्केलपेक्षा मोठया भूकंपांचे निरीक्षण केले आहे. प्रत्येक 32 वर्षांनी मोठ्या तीव्रतेचे भूकंप येत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले आहे. त्याचबरोबर पृथ्वीच्या परिवलनाची गती ही या भूकंपांचे मूळ कारण असल्याची धक्कादायक माहितीही त्यांच्या लक्षात आली.
या वैज्ञानिकांच्या अभ्यासात साधारणतः 25 ते 30 वर्षांनी पृथ्वीची गती मंदावण्यास सुरुवात होते असे दिसून आले. ही गती मंद होण्याची प्रक्रिया भूकंपांच्या अगदी थोडा काळ आधी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारचे मंदावणे गेली पाच वर्षे सुरु आहे. मागच्या वर्षी सर्वात जास्त तीव्र भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली आहे. परिवलन गती मंद होण्याच्या आताच्या मालिकेचे 2017 हे सलग चौथे वर्ष होते. 2018 हे या मालिकेचे पाचवे वर्ष असल्यामुळे पुढच्या वर्षी अधिक भूकंप होतील असे मत तज्ज्ञांनी अभ्यासावरुन मांडले आहे.
पृथ्वीची गती मंदावल्याने भूकंप कसे होतात?
पृथ्वीच्या गाभ्याचे अंतर्गत आणि बाह्य असे दोन भार असतात. बाह्य भागा हा द्रवरुप लोह आणि निकेल पासून बनलेला आहे तर अंतर्गाभा हा स्थायूरुप लोह व निकेलने बनलेला आहे. पृथ्वीच्या पृष्ठावरील कवचाच्या आत मॅंटल हा गाभा आणि कवचाच्या मध्ये असतो. हे मॅंटल थोडेसे द्रवरुप असते. भूगर्भशास्त्राच्या दृष्टीकोनातून दीर्घकालीन विचार करायचा झाला तर त्याला जाड द्रवरुप पदार्थ म्हणता येईल.
बिलहॅम आणि बेंडीक या तज्ज्ञांच्या मते प्रत्येक काही वर्षांनंतर मॅंटल त्याच्या अर्धवट द्रवरुपतेमुळे पृथ्वीच्या बाह्य कवचाला चिकटतो.त्यामुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) बदलते. त्याचा परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होतो आणि ही गती काही मिलीसेकंदांनी कमी होते व दिवसाच्या आकारातही बदल होतो. यासर्व प्रकारामुळे मॅंटलमध्ये चुंबकीय तरंग निर्माण होतात व त्यामुळेच भूकंप होतो. गेल्या चार वर्षांमध्ये पृथ्वीची गती कमी होत असल्यामुळे पुढली वर्षी भूकंपांची संख्या वाढतील असे या दोघा तज्ज्ञांचे मत आहे.
Upsurge in big earthquakes predicted for 2018 as Earth rotation slows https://t.co/HiZRrFwgELpic.twitter.com/dJZ9GxMv6m
— Donald Lee (@DonLeeNY) November 20, 2017