पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा सहावा विनाश मानवी हव्यासामुळे होणार?

By admin | Published: June 2, 2017 12:44 AM2017-06-02T00:44:13+5:302017-06-02T00:44:13+5:30

पृथ्वीवरील सजीवसृष्टी सहाव्यांदा मोठ्या प्रमाणावर विनष्ट होण्याचा धोका आहे आणि यावेळी हा धोका मानवाकडून निर्माण

Earth's Sixth Destruction of Humanity Will Be Human Resistance? | पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा सहावा विनाश मानवी हव्यासामुळे होणार?

पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा सहावा विनाश मानवी हव्यासामुळे होणार?

Next

लंडन : पृथ्वीवरील सजीवसृष्टी सहाव्यांदा मोठ्या प्रमाणावर विनष्ट होण्याचा धोका आहे आणि यावेळी हा धोका मानवाकडून निर्माण केला जात आहे, असा इशारा जगभरातील आघाडीच्या वैज्ञानिकांनी ‘नेचर’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकातील आगामी लेखातून दिला आहे.
गेल्या ५० हजार वर्षांत पृथ्वीवरील सजीवसृष्टी पाच वेळा मोठ्या प्रमाणावर विनष्ट झाली होती. अंतराळातून आलेली एखादी महाकाय अशनी पृथ्वीवर येऊन आदळणे किंवा ज्वालामुखींचे प्रचंड उद्रेक अशा विनाशकारी घटना त्यावेळी कारणीभूत ठरल्या होत्या. मात्र आता अशी कोणतीही एक महाविध्वंसक घटना न घडताही पूर्वीच्या पाच वेळच्याच दराने पृथ्वीवरील सस्तन प्राणी, जलचर व पक्ष्यांच्या प्रजाती विनष्ट होत असल्याचे नमूद करून हा इशारा देण्यात आला आहे.
वैज्ञानिक लिहितात की, गेल्या काही शतकांत जमीन आणि सागरांवर होणारा मानवी कृतींच्या दुष्परिणामात न भूतो अशी वाढ झाली आहे. त्यामुळे सजीवसृष्टीचे वैविध्य रोडावले आहे. पूर्वी सजीवसृष्टी विनष्ट होण्याच्या काळात सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याचे जे प्रमाण जिवाश्म पुराव्यांवरून दिसून येते त्याहून अधिक वेगाने आता सजीवांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. सजीवांच्या विविध प्रजातींच्या नैसर्गिक अधिवासांचे रक्षण करून, आहारात बदल करून आणि निसर्ग संरक्षणाचे इतर अनेक उपाय योजून धोक्याच्या दिशेने सुरू असलेली ही वाटचाल थांबविली जाऊ शकते, असा आशेचा किरणही वैज्ञानिकांना वाटतो.
सर्व सजीवांचे नैसर्गिक अधिवास शाबूत ठेवूनही सन २०६० पर्यंत अपेक्षित असलेल्या १० अब्ज मानवी लोकसंख्येस सकस आहार पुरविता येईल एवढी पृथ्वीची क्षमता नक्कीच आहे. मात्र, त्यासाठी मानवाने फक्त स्वत:चा व अल्पकालिक विचार न करता सुजाणपणे धोरणे राबविण्याची गरजही वैज्ञानिकांनी अधोरेखित केली. (वृत्तसंस्था)

मानवाची सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येच्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या गरजा भागविण्यासाठी नैसर्गिक साधनांचा ओरबाडणे म्हणता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा वापर ही वैज्ञानिकांच्या मते या नव्या धोक्याची प्रमुख कारणे आहेत. गेल्या ५० वर्षांत पृथ्वीवरील मानवांची संख्या १३० टक्क्यांनी वाढली आहे व सन २०६० पर्यंत ती आणखी वाढून १० अब्जांवर जाण्याची शक्यता आहे.

वाढती लोकसंख्या सर्वांच्याच मुळावर

मानवांची ही वाढती संख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अन्य सजीवांच्या विनष्टतेस कारणीभूत ठरत आहे.
प्रमाणाबाहेर होणारी शिकार, प्राण्यांची अवैध हत्या, प्राणी-पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, घुसखोर आणि शिकारी प्रजातींमध्ये वाढ होणे आणि मानवाच्या वाढत्या अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या अन्य समस्यांमुळे सस्तन प्राण्यांच्या २५ टक्के व पक्ष्यांच्या १३ टक्के प्रजातींसह सजीवांच्या हजारो प्रजातींना विनष्टतेचा धोका निर्माण झाला आहे.

सावध करणारा पूर्वेतिहास

याच नियतकालिकातील आणखी एका लेखात वैज्ञानिकांनी यापूर्वी मानवी हव्यासापोटी अन्य सजीवसृष्टी नष्ट होण्याचे कालखंड कसे होऊन गेले याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे चित्रही मांडले आहे.
आॅस्ट्रेलिया खंडात (५० हजार वर्षांपूर्वी), उत्तर व दक्षिण अमेरिका खंडात (१०-११ हजार वर्षांपूर्वी) व युरोप खंडात (३ ते १२ हजार वर्षांपूर्वी) सजीवांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणावर नष्ट होण्याचे जे कालखंड होऊन गेले ते मानवाने प्रमाणाबाहेर केलेली शिकार व नैसर्गिक पर्यावरणात झालेले बदल या दोन्हींच्या एकत्रित परिणामांमुळे होते. ज्यांचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त आहे अशा जमिनीवर वावरणाऱ्या सजीवांच्या निम्म्या प्रजाती व पक्ष्यांच्या १५ टक्के प्रजाती गेल्या तीन हजार वर्षांत विनष्ट झाल्या आहेत.

Web Title: Earth's Sixth Destruction of Humanity Will Be Human Resistance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.