थंडगार भात खा आणि कॅलरी घटवा
By Admin | Published: March 27, 2015 01:40 AM2015-03-27T01:40:58+5:302015-03-27T01:40:58+5:30
भात खाल्ल्याने लठ्ठपणा येतो ही जुनी समजूत; पण नव्या संशोधनानुसार भातात कॅलरीज कमी करण्याचे नवे तंत्र असून, या तंत्राने भात शिजवून तो थंड करून खाल्ल्यास कॅलरी कमी होतात,
लंडन : भात खाल्ल्याने लठ्ठपणा येतो ही जुनी समजूत; पण नव्या संशोधनानुसार भातात कॅलरीज कमी करण्याचे नवे तंत्र असून, या तंत्राने भात शिजवून तो थंड करून खाल्ल्यास कॅलरी कमी होतात, म्हणजेच खाणारी व्यक्ती स्थूल होण्याऐवजी सडपातळ होते. थोडेसे खोबऱ्याचे तेल घालून भात शिजवा आणि शिजलेला भात किमान अर्धा दिवस फ्रीजमध्ये ठेवा. असा भात खाल्ल्यास कॅलरी ६० टक्के कमी होतात, असा श्रीलंकेतील संशोधकांचा दावा आहे.
अमेरिकन केमिकल सोसायटीला त्यांनी कॅलरी कमी होण्याचे कारणही दिले आहे. अशा पद्धतीने भात शिजवला असता, भातातील स्टार्च लवकर पचत नाही, त्यामुळे शरीराला ते पचण्यासाठी जास्त कॅलरी खर्च कराव्या लागत नाहीत. अशा पद्धतीने कॅलरी कमी झाल्या तरीही वजन लवकर कमी होणार नाही, असा इशारा इंग्लंडमधील आहारतज्ज्ञांनी दिला आहे. भातासारखे पिष्टमय पदार्थ कार्बोहैड्रेट म्हणून ओळखले जातात. जेव्हा ते खातो तेव्हा शरीरात त्यांचे विघटन होते व त्यांचे रूपांतर साखरेत होते. रक्तात ग्लुकोज प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा, त्याचे रूपांतर चरबीत होते. (वृत्तसंस्था)
अन्नपदार्थातील घटक बदलून ते पचण्यासाठी कमी कॅलरी लागतील तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही योग्य राहील असे खाद्यपदार्थ तयार करण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयोग चालू आहेत. इंग्लंडमधील संशोधकांनी याआधी पास्ता (इटालियन पदार्थ) थंड करून खाल्ल्यास ग्लुकोजची निर्मिती कमी होते, थंड केलेला पास्ता पुन्हा गरम करून खाल्ला तरीही हा परिणाम साधता येतो, असा निष्कर्ष काढला आहे. श्रीलंकेतील संशोधकांनी हाच प्रयोग भातावर केला आहे. श्रीलंकेतील संशोधकानी तांदळाच्या ३८ प्रकारांवर संशोधन केले आहे. तांदळातील पिष्टमय पदार्थ लवकर पचू नयेत यासाठी तांदूळ कशा प्रकारे शिजवावा याची पद्धत त्यांनी शोधून काढली आहे.
४कॅलरीज कमी खर्च करणारा स्टार्च दमदार स्टार्च म्हणून ओळखला जातो. शरीरातील पाचकरसांचा परिणाम त्यावर फारसा होत नाही. कर्बोदके (कार्बोहैड्रेट) विघटित करण्याकरिता शरीर या पाचकरसांचे साह्य घेते; पण पाचकरसांचा परिणाम न झाल्याने कॅलरीज कमी खर्च केल्या जातात. हे साध्य करण्यासाठी भात चमचाभर खोबरेल तेल लावून ४० मिनिटे ठेवा. नंतर १२ तास तो फ्रीजमध्ये ठेवा.
१ संशोधक सुधैर जेम्स यांच्या मते भात करण्याच्या या प्रक्रियेत भात थंड करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पिष्टमय पदार्थात (स्टार्च) अमिलोज हा घटक असतो. १२ तास थंड ठेवल्यामुळे भाताच्या दाण्याबाहेर अमिलोजच्या अणूजवळ हायड्रोजनची साखळी तयार होते, त्यामुळे स्टार्च पचण्यास कठीण होतो. थंड केलेला भात पुन्हा गरम केला तरीही ही साखळी कायम राहते. ब्रिटिश पोषण संघटनेच्या सारा को यांच्या मते दमदार स्टार्चचे अनेक फायदे आहेत.
२ यामुळे पचन सुधारते व रक्तातील साखरेची पातळीही कायम राहते. असा भात खाण्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम शोधण्यासाठी आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. कारण अन्न शिजवल्यानंतरही काही घातक जंतू अन्नात कायम असतात. शिजवलेला भात नेहमीच्या तापमानावर ठेवला तर त्यातील सूक्ष्म जंतू कायम राहतात. म्हणूनच भात एक तर गरम खावा किंवा गार करून फ्रीजमध्ये ठेवावा.