बोलताना शब्द खाता? मल्टी टास्किंग थांबवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 10:00 AM2023-07-03T10:00:05+5:302023-07-03T10:00:20+5:30
एकाच वेळी आपण एकापेक्षा जास्त कामं केली, कायम मल्टी टास्टिंग केलं तर अनेक गोष्टींत आपण संतुलन साधू शकतो, असंही आपल्याला वाटत असतं, पण हा एक भ्रम आहे.
रोज आपण किती काम करतो? एका मागोमाग कामांचा रगाडा सुरूच असतो. हे झालं की ते. ते झालं की हे अनेकदा अनेक जण तर एकाच वेळी एकापेक्षा जास्त कामं करत असतात. यालाच आपण मल्टी टास्किंग म्हणतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं, एका दिवसात ४८ तास असते किंवा दिवस मोठा असता तर किती बरं झालं असतं. अलीकडच्या काळात तर आपलं काम आणि घरगुती जीवन यातील सीमारेषाही कल्पनेपलीकडे अस्पष्ट झाली आहे. त्यामुळे आपण आपल्या घरासाठी झटतो आहोत की आपल्या ऑफिससाठी, कार्यालयासाठी हे समजणंही मुश्कील झालं आहे.
एकाच वेळी आपण एकापेक्षा जास्त कामं केली, कायम मल्टी टास्टिंग केलं तर अनेक गोष्टींत आपण संतुलन साधू शकतो, असंही आपल्याला वाटत असतं, पण हा एक भ्रम आहे. मल्टी टास्किंग आपल्यासाठी नवीन नाही. प्रत्येक जण ते करतच असतो. आजच्या रिमोट वर्कच्या स्पर्धेच्या आणि स्वतःला कायम सिद्ध करत राहाण्याच्या काळात ते जास्तच आवश्यक झालं आहे. मल्टी टास्किंगमुळे एकाच वेळी अनेक कामं आपण पूर्ण करीत आहोत, आपला 'बॅकलॉग' आपण झपाट्यानं पूर्ण करीत आहोत, असा भास आपल्याला सतत होत राहतो, पण ते खरं नाही.
मुळात मल्टी टास्किंग ही गोष्टच वास्तविक नाही. असं केल्यामुळे खरं तर तुम्ही फक्त आपल्या कामांचा प्राधान्यक्रम मागेपुढे करीत असता. यापेक्षा जास्त काही त्यातून साध्य होत नाही. खरंतर एकच काम जेव्हा तुम्ही पूर्ण सजगतेनं आणि कार्यक्षमतेनं करता, तेव्हा ते अधिक चांगलं होतं, त्यातून मिळणारं समाधानही जास्त असतं. मात्र, एकाच वेळी जास्त कामांची शारीरिक आणि मानसिक ओझी तुम्ही वाहत असाल तर बहुदा प्रत्येक काम तुम्ही कमी कार्यक्षमतेनं करता त्याला अधिक वेळ लागतो आणि ते थोडं कमअस्सल होण्याची शक्यताही जास्त असते. याशिवाय तुम्ही तुमचं मानसिक आरोग्यही पणाला लावत असता, त्याला हानी पोहोचवत असता.
जगात फारतर दोन ते अडीच टक्के लोकच असे असतील, असू शकतात, जे खरंच मल्टी टास्किंग करू शकतात, बाकीच्यांनी मात्र यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचाच अधिक गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि त्यासाठी पर्यायी चांगले मार्ग धुंडाळले पाहिजेत.
तुम्ही जर मल्टी टास्किंगच्या मागे लागला असाल, तर थोडं थांबा. आपला स्पीड कमी करा. एका वेळी शक्यतो एकाच गोष्टीवर फोकस करा आणि मग पुन्हा कामाला लागा. यासंदर्भात नुकतंच एक व्यापक संशोधन झालं आहे आणि त्यावर मल्टी टास्किंगच्या दुष्परिणामांवर गांभीर्यानं सजग करण्यात आलं आहे.
आपण आपली नेहेमीची कामं करतच असतो, पण कधीकधी अचानक आपल्याला समोरच्या परिचयाच्या व्यक्तीचंही नावच आठवेनासं होतं, आपला फोन कुठे ठेवला ते लक्षात राहात नाही, आपल्या चाव्या आपण कुठेतरी ठेवून देतो आणि मग त्या शोधत बसतो, चष्मा सापडला नाही की चिडचिड करतो, बोलताना मध्येच काही शब्द खाल्ले जातात, ऑनलाइन बिल भरण्यासाठी मोबाइल तर हातात घेतो, पण आपल्याला काय करायचं होतं, तेच विसरून जातो. प्रत्येकाच्या बाबतीत या गोष्टी होतात आणि ते 'नॉर्मल'ही आहे. पण हे जर वारंवार घडायला लागलं, तर मात्र समजायचं, काही तरी गडबड आहे. मेंदूच्या संदर्भातील आजाराचा हा संकेत असू शकतो आणि काही वेळा ते गंभीरही असू शकतं..
जमेल की, फार अवघड नाही ते!
मल्टी टास्किंगची आपल्याला सवय असेल तर ती लगेच मोडता येणार नाही, पण थोडे प्रयत्न केले तर त्यापासून नक्कीच लांब राहता येऊ शकतं. एकाच वेळी अनेक कामं करीत असला, तर आधी आपला अॅप्रोच बदला. एक यादी करा. प्राधान्यक्रमानुसार सर्वांत महत्त्वाचं काम आधी करा. ते झालं की दुसऱ्या कामाला हात लावा. आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवा, माइंडफुलनेसचा वापर करा आणि मनातला तसंच आजूबाजूचा कचारा, गोंधळ कमी करा.....
अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या
न्यूरोसायकॉलॉजिस्ट एलिस कॅकापोला यासंदर्भात आपल्याला सजग करताना सांगतात, थांबा आता जरा. मल्टी टास्किंग थोडं बाजूला ठेवा. आपण जेव्हा कोणतंही काम करीत असतो, तेव्हा मेंदूशी संबंधित अनेक नेटवर्क क्रियाशील असतात, पण मल्टी टास्किंगमध्ये या नेटवर्कमध्येच गडबड होऊन स्मरणशक्ती आजारी पडू शकते. मल्टी टास्किंगमुळे विशेषतः आपल्या मानसिक आरोग्यावर पाच प्रकारचे दुष्परिणाम होतात. मेंदूच्या कार्याशी तडजोड व्हायला सुरुवात होते, आपल्याला सातत्यानं तणाव जाणवायला लागतो, त्यामुळे नैराश्य येऊ शकतं, आपली प्रेरणाशक्ती कमजोर होऊ शकते आणि स्मरणशक्ती दगा देऊ शकते.