इबोला प्रतिबंधक लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी
By admin | Published: November 5, 2014 01:09 AM2014-11-05T01:09:46+5:302014-11-05T01:09:46+5:30
पश्चिम आफ्रिकेतील पाच देशांमध्ये १० हजारांहून अधिक बळी घेतलेल्या व अमेरिका आणि युरोपने धास्ती घेतलेल्या इबोला या अत्यंत प्राणघातक रोगावरील, नाकाने हुंगता येईल
वॉशिंग्टन : पश्चिम आफ्रिकेतील पाच देशांमध्ये १० हजारांहून अधिक बळी घेतलेल्या व अमेरिका आणि युरोपने धास्ती घेतलेल्या इबोला या अत्यंत प्राणघातक रोगावरील, नाकाने हुंगता येईल अशा, जगातील पहिल्या प्रतिबंधक लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या खूपच यशस्वी ठरल्या असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
टेक्सास विद्यापीठात अशी लस विकसित करण्याचे संशोधन सुरु असून या लसीचे मानवाखेरीज अन्य वानरवर्गीय प्राण्यांवर प्रयोग केले असता त्याने इबोलाच्या विषाणूंची लागण होण्यापासून दीर्घकाळ संरक्षण मिळू शकते, असे निष्कर्ष दिसून आले आहेत. अमेरिकेच्या विन्नीपेग येथील नॅशनल मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरीच्या प्रा. मारिया क्रॉयले व डॉ. गॅरी कॉबिंगर या नव्या लसीच्या चाचण्यांसंबंधीची अधिकृत घोषणा बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी करणार आहेत. प्रा. क्रॉयले व त्यांचा वैज्ञानिकांचा चमू या लसीचे नाकाने हुंगता येईल असे संमिश्रण विकसित करण्यावर गेली सात वर्षे काम करीत आहे. या लसीचे मानवेतर वानरवर्गीय प्राण्यांवर प्रयोग केले असता त्यांना इबोला झैरे १५० प्रजातीच्या विषाणूंच्या संपर्कात येऊनही त्याची लागण होण्यापासून संरक्षण मिळण्याचे प्रमाण ७६ ते १०० टक्के असल्याचे दिसून आले आहे. हे यश विशेष लक्षणीय मानले जात आहे, कारण याआधी हीच लस इंजेक्शनच्या स्वरूपात दिलेल्या वानरवर्गीय प्राण्यांना इबोलाची लागण होण्यापासून मिळू शकणारे संरक्षण ५० टक्क्यांपर्यंतच असल्याचे निष्पन्न झाले होते. प्रा. क्रॉयले यांच्या संशोधनाचा पुढचा टप्पा हीच लस माणसांसाठी वापरून त्यांच्या चिकित्साविषयक चाचण्या घेण्याची असेल. याशिवाय हीच लस अत्यंत पातळ पापुद्र्याच्या स्वरूपात जिभेखाली ठेवून देणे शक्य आहे का याच्या वानरवर्गीय प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांतून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे हे कामही त्यांना करायचे आहे. (वृत्तसंस्था)