आशियात इबोलाचा धोका
By admin | Published: October 27, 2014 01:51 AM2014-10-27T01:51:23+5:302014-10-27T01:51:23+5:30
पश्चिम आफ्रिकेत इबोलाचा कहर जेवढा काळ राहील तेवढाच वेळ कोणताही प्रवासी इबोलाग्रस्त होऊन आशियात याचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे.
सिंगापूर : पश्चिम आफ्रिकेत इबोलाचा कहर जेवढा काळ राहील तेवढाच वेळ कोणताही प्रवासी इबोलाग्रस्त होऊन आशियात याचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे. या आजाराच्या निदानाची गती व उपचार पद्धती यावरच इबोलाचे नियंत्रण अवलंबून आहे, असे विकसनशील देशांतील आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
आशियातील आरोग्य सेवा खराब प्रतीच्या असून या भागात गरिबीचे प्रमाणही प्रचंड आहे. इबोलाच्या नियंत्रणावरूनच याचा किती प्रसार होईल, हे अवलंबून आहे. विमानतळावर निगराणी वाढविण्यात आली आहे. सर्वच देशांकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तरीही आशियातील विकसनशील देशांत या विषाणूंचा प्रसार जीवघेणा ठरेल व त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होईल, अशी भीती आरोग्य क्षेत्रातील जाणकारांना आहे.
दिल्लीनजीकच्या मेदांता मेडिसिटी हॉस्पिटलचे डॉ. यतीन मेहता यांनी सांगितले की, इबोलावर अद्याप ठोस औषधोपचार होत नाहीत. याचा मृत्यूदरही खूप अधिक आहे. एवढेच नाहीतर अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही यावर आळा घालण्यात यश आले नाही. सरकार प्रयत्न करत आहे. ते प्रशिक्षण देत आहेत. मात्र, आपत्ती व्यवस्थापन ढिसाळ असल्याचा आमचा इतिहास आहे.
आशियात जगातील ६० टक्के लोकसंख्या राहते. विकासाच्या बाबतीत पश्चिम आफ्रिकेच्या तुलनेत आशिया कितीतरी पुढे आहे. सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया व जपान यासारख्या विकसित व उभरत्या अर्थव्यवस्था आशियात आहेत.
युनोतील अमेरिकेच्या राजदूत इबोलाने प्रभावित पश्चिम आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांतील लोकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अमेरिकेत येण्यास अटकाव करण्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजदूतांचा हा दौरा होत आहे. (वृत्तसंस्था)