लाहोरमधल्या ऐतिहासिक रेड लाइट एरियाला ई-कॉमर्समुळे ग्रहण
By admin | Published: August 23, 2016 12:28 PM2016-08-23T12:28:11+5:302016-08-23T12:28:11+5:30
हीरा मंडी किंवा ज्याला पाकिस्तानच्या लाहोरमधील कामाठीपूरा म्हणता येईल, या बाजाराला तंत्रज्ञानाचा फटका बसला असून फेसबुक, ट्विटर आणि वेबसाइट्सनी संपूर्ण व्यवसाय बसवल्याचं चित्र आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 23 - हीरा मंडी किंवा ज्याला पाकिस्तानच्या लाहोरमधील कामाठीपूरा म्हणता येईल, या बाजाराला तंत्रज्ञानाचा फटका बसला असून फेसबुक, ट्विटर आणि वेबसाइट्सनी संपूर्ण व्यवसाय बसवल्याचं चित्र आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, जगातल्या सगळ्यात जुन्या व्यवसायात म्हणजे शरीर विक्रय व्यवसायातही ई कॉमर्सने जोरदार मुसंडी मारली असून मुघल काळापासून म्हणजे 15व्या शतकापासून तेजीत असलेल्या हिरा मंडीला ग्रहण लागलं आहे. मुजरा, गाण्याच्या व नृत्याच्या मैफिली आणि त्याच्या जोडीने चालणारा शरीर विक्रय व्यवसाय असलेला हीरा मंडीचा हा ऐतिहासिक वारसा लुप्त होण्याच्या मार्गावर असून, शरीर विक्रय करणाऱ्या महिला फेसबुक व अन्य ऑनलाइन माध्यमांच्या द्वारे व्यवसाय करत असल्याचे स्थानिकांच्या हवाल्याने एएफपीने म्हटले आहे.
एका दशकापूर्वीपर्यंत हीरा मंडीचा व्यवसाय तेजीत होता, पिढ्यानपिढ्या तो चालत आलेला होता, मात्र ई कॉमर्समुळे ग्राहक हीरा मंडीकडे पाठ फिरवत असल्याचे तिथल्याच एका शरीर विक्रय करणाऱ्या महिलेने सांगितले आहे.
हीरा मंडीतल्या महिलांकडे सन्मानाने बघितले जात असे, त्यांना कलाकार म्हणून संबोधले जात असे, मात्र आता सगळं बदललं आहे आणि केवळ शरीर विक्रय करणाऱ्या महिला अशी ओळख राहिली आहे, असे एका महिलेने सांगितले. त्यामुळे फेसबुक, लोकॅन्टो किंवा स्काइपच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होते असे ती म्हणाली.
डझनाच्या घरात अशा एस्कोर्ट्स सेवा असून कराची, लाहोर व इस्लामाबादमधल्या हजारो ग्राहकांना शरीर विक्रय करणाऱ्या महिला पुरवण्यात येतात. काही वेबसाइट्स तर दुबई व सिंगापूरमधल्या ग्राहकांची मागणी पूर्ण करत असल्याचेही या क्षेत्रातल्या एका व्यक्तिने सांगितले.
एका वेबसाईटने तर आपण 50 हजार ग्राहकांना सेवा देत असल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानाचा फायदा घेत, केवळ पारंपरिक व्यवसाय असलेल्या मुलीच नाहीत, तर उच्चशिक्षित व समाजाच्या उच्च स्तरातील मुलीही पैशासाठी शरीरविक्रय करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.