इंग्लंडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव उत्साहात!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 01:29 AM2019-09-08T01:29:15+5:302019-09-08T01:29:38+5:30
सांगलीच्या शीतल चिमड यांचा पाच वर्षांपासून उपक्रम; २०० अनिवासी भारतीयांना जोडले
कोल्हापूर : मूळचे सांगलीचे असलेले शीतल चिमड यांनी इंग्लंडमध्ये गेली पाच वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे यंदा जवळपास २०० हून अधिक अनिवासी भारतीयांनी त्यांच्या घरी शाडूच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. चिमड यांच्यामुळे गणेशोत्सव व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे इंग्लंडमधील अनिवासी भारतीय एकत्र आले
आहेत.
इंग्लंडमध्ये कोव्हेंट्री येथे राहणारे शीतल चिमड हे जग्वॉर लँड रोव्हर कंपनीत डिझायनिंग इंजिनिअर आहेत. सुरुवातीला पुण्यातील टाटा तसेच महिंद्रा कंपनीत त्यांनी नोकरी गेली; पण गेल्या पाच वर्षांपासून ते इंग्लंडमध्ये आहेत. पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करण्यात त्यांनी भारतात असतानाच पुढाकार घेतला होता.
इंग्लंडमध्येही व्यवसाय म्हणून गणेशमूर्ती तयार न करता केवळ भारतीय उत्सव परदेशातही जोमाने साजरा करावा, या हेतूने त्यांनी या मूर्ती तेथे उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांनी तेथील शाळांमध्येच गणेशाच्या या पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या. त्यासाठी महिनाभर आधी कार्यशाळा घेऊन या मूर्ती कशा तयार करायच्या याची माहिती दिली. या कार्यशाळेत तयार झालेल्या विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची इंग्लंडमधील जवळपास २०० हून अधिक अनिवासी भारतीयांच्या घरी प्रतिष्ठापना केली गेली.
शाडूच्या मूर्तींचा शीतल चिमड यांचा आग्रह
इंग्लंडमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महिनाभर आधीच चिमड यांच्याकडे गणेशमूर्तींची मागणी असते. नोकरीव्यतिरिक्त असलेला वेळ चिमड हे या मूर्ती तयार करण्यासाठी देतात. या कामात त्यांना घरच्यांचीही मदत मिळते.अनेक घरांमध्ये मूर्ती विकत न आणता घरीच तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते.
सार्वजनिक उत्सवात भारतीय संस्कृतीचे दर्शन
इंग्लंडमधील सार्वजनिक गणेशोत्सवात विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. सर्वजण या काळात भारतीय पोशाख आणि खाद्यपदार्थांवर भर देतात. भारतीय खेळ, नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मोठी रेलचेल असते. कोव्हेंट्री येथे ढोल-ताशा आणि लेझीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशाचे स्वागत झाले असून उत्सवाची धूम सुरू आहे.