दहशतवाद्यांना आर्थिक रसद; हाफीजसह १३ जणांवर पाकिस्तानमध्ये गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 05:05 AM2019-07-05T05:05:59+5:302019-07-05T05:10:02+5:30
फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये टाकले होते.
इस्लामाबाद : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व जमात-उद-दावाचा (जेयूडी) प्रमुख हाफीज सईद व त्याच्या १२ साथीदारांवर दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याच्या व मनी लाँड्रिंगच्या विविध प्रकरणांत पाकिस्तानी तपास यंत्रणांनी गुन्हे दाखल केले आहेत. हाफीज सईदने हा पैसा आपल्या धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून गोळा केला होता. त्याला लवकरच अटक होईल, असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, जमात-उद-दावाच्या १३ नेत्यांविरोधात २३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांनी दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याचे पुरावे तपास यंत्रणांना मिळाले आहेत. दहशतवादी संघटनांची आर्थिक रसद तोडण्यासाठी पाकिस्तान ठोस पावले उचलत नसल्याबद्दल अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स व आणखी काही महत्त्वाच्या देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तशी कारवाई करावी म्हणून या देशांनी पाकिस्तानवर दबाव आणला होता.
फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये टाकले होते. दहशतवाद्यांना मिळणारा पैसा व मनी लाँड्रिंग रोखण्यासाठी पाकिस्तानमधील कायदे अपुरे आहेत. दहशतवाद्यांना मिळणारे पैशाचे पाठबळ पूर्णपणे थांबविण्यासाठी पाकिस्तानने आॅक्टोबरपर्यंत कारवाई पूर्ण करावी; अन्यथा परिणामांना सामोरे जावे, अशी ताकीद एफएटीएफने दिली होती. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया पूर्णपणे बंद होतील याकडेही पाकिस्तानने लक्ष द्यावे असेही एफटीएफने म्हटले होते.
संबंध ताणलेलेच
अल्् अनफाल ट्रस्ट, दावत उल इर्शाद ट्रस्ट, मौज बिन जबल ट्रस्ट आदी धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून पैसा गोळा करून मालमत्ता विकत घेण्यात आली. या उलाढालीतून येणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी पुरविण्याचे काम हाफीज सईद व त्याचे साथीदार करीत होते.
- जमात-उद-दावाच्या मुख्यालयाला मार्च महिन्यामध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सील ठोकले, तसेच १२० संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा बंद केली असून, दोन्ही देशांतील संबंध ताणलेलेच आहेत.